ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21- राज्यात यावर्षी मोठा दुष्काळ पडला. केंद्र सरकारने दुष्काळनिवारणासाठी पाहिजे तशी मदत केली नाही. दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी त्यांच्या काळात दुष्काळाच्या वेळी महाराष्ट्रात येऊन पाहणी केली. दिलासा दिला. मात्र, महाराष्ट्रात लोकसभा व निवडणुकीच्या प्रचारसभांचा धडाका लावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढा भीषण दुष्काळ पडला असताना महाराष्ट्रात फिरकले नाहीत. आता २५ जून रोजी पुण्यात ते स्मार्ट सिटीच्या उद्घाटनाला येण्यासाठी मात्र त्यांच्याकडे वेळ आहे. यावरून शेतकऱ्यांप्रति पंतप्रधान किती गंभीर आहे हे दिसून येते, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते व नागपूर जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी केली. वळसे पाटील यांन नागपुरात शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर नापास झाल्याचे टीकास्त्र सोडले. वळसे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आले. मात्र, त्यानंतर त्यांचा आलेख घसरत चालला आहे. आसाम वघळता पाच राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. मात्र, केवळ आसामचा गवगवा करून लाट कायम असल्याचे भासविले जात आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा लगेच जनतेवर निवडणुका लादल्या जावू नये म्हणून राष्ट्रवादीने भाजपला पाठबळ देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी भविष्यात कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. काँग्रेस हाच आपला नैसर्गिक मित्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षसंघटनेची पुनर्रचना केली जाणार आहे. रिक्त असलेल्या पदांवर लवकरच नियुक्त्या केल्या जातील. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करून मेळावे, शिबिर, प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर मांडले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पक्षात कुठलिही गटबाजी नसून सर्वजण एकदिलाने काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी नागपूर शहर अध्यक्ष अनिल देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. दीनानाथ पडोळे, अजय पाटील, राजाभाऊ ताकसांडे, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.भाजप-सेनेचा वाद की रणनीती- भाजप व शिवसेनेत वाद असल्याचे दाखविले जाते. कल्याण- डोंबीवली महापालिकेच्या निवडणुकीतही असेच झाले. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र बसले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक या दोन्ही जागा बळकवायची भाजप- सेनेची रणनीती असू शकते, अशी शंका वळसे पाटील यांनी व्यक्त केली.आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर- महापालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसची आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पक्षाचे नेते घेतील, असे स्पष्ट करीत स्वबळावर सर्व जागा लढण्याच्या दृष्टीने पक्षाची तयारी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांना स्मार्टसिटीसाठी वेळ, दुष्काळ पाहणीसाठी नाही - वळसे पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2016 8:52 PM