पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (13 जुलै 2024) मुंबई दौऱ्यादरम्यान नेस्को सेंटरमध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पन आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी देशात नोकऱ्या निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आरबीआयने नोकऱ्यांसंदर्भात नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. या आकडेवारीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत. हे लोक (विरोधक) गुंतवणुकीला, पायाभूत सुविधांना आणि देशाच्या विकासाला विरोध करतात. मात्र आता त्यांचा बुरखा फाटत आहे."
पंतप्रधान मोदी म्हणाले, "एनडीए सरकारचे विकास मॉडेल वंचितांना प्राधान्य देणारे आहे. आम्ही अनेक दशकांपासून शेवटच्या रांगेत असलेल्यांना प्राधान्य देत आहोत. नव्या सरकारचा शपथविधी होताच, आम्ही गरीबांसाठी पक्की घरे आणि शेतकऱ्यांशी संबंधित मोठे निर्णय घेतले आहेत."
"महाराष्ट्रातील महायुती सरकारही अशाच बांधिलकीने काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने दरवर्षी 10 लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे, याचा मला आनंद वाटला. कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांचा पर्यटन, कृषी आणि उद्योगांना मोठा फायदा होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यामुळे महिलांनाही सुरक्षा, सुविधा आणि सन्मान मिळतो. अर्थात एनडीए सरकारची ही कामे गरीब, शेतकरी, स्त्री शक्ती आणि युवाशक्तीला सशक्त करण्यासाठी आहे," असेही मोदी म्हणाले.
अटल सेतूच्या मुद्यावरून विरोधकांवर निशाणा -अटल सेतूला भेगा गेल्याचे म्हणत काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले होते. हाच धागा धर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. “मुंबईतील लोकांचे जीवनमान सुधारणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे मुंबई परिसरातील कनेक्टिविटी चांगली केली जात आहे. मुंबईतील कोस्टल रोड आणि अटल सेतूचे काम पूर्ण झाले आहे. आणि अटल सेतूसंदर्भात चुकीची माहिती पसरवण्यात आली होती, हेही आपल्याला माहीतच असेल," असे मोदी म्हणाले.