Ajit Pawar in Pm Modi Pune Program | श्री संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर देहू येथे झालेल्या लोकार्पण कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर अजित पवारही उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलण्याचा मान दिला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. असं नक्की का घडलं असावं, याचं कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या मागील पुणे दौऱ्यातील पुणे महानगर पालिकेच्या कार्यक्रमात काही व्यक्तींना खडे बोल सुनावल्याने भाजपाने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची धास्ती घेतलेली दिसत आहे. म्हणूनच अजितदादा पवार यांना षडयंत्र करून आज देहू येथील कार्यक्रमात बोलू दिलेले नाही. राज्यातील सर्वाधिक महत्वाच्या पदावरील व्यक्तीचा अपमान हा पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आणि भाजपाला टोलाही लगावला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या आधी दोन शब्द बोलण्यास सांगण्यात आले. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असूनही अजित पवारांना बोलू दिलं गेलं नाही, याचा घटनेचा राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला व नाराजी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न देणे हा भाजपने केलेला महाराष्ट्राचा अपमान आहे, असा सूर सर्वच नेत्यांच्या तोंडून दिसून आला.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या...
"पंतप्रधान नरेंद्र मोदी असलेल्या मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे भाषण नाकारले जाते. पण, याच मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषणाची संधी दिली जाते, ही बाब दुर्दैवी आणि महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना भाषणाची संधी मिळणे आवश्यक होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री कार्यालयातून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. तरीही अजित पवारांचे भाषण नाकारले आणि देवेंद्र फडणवीसांना संधी दिली जाते. हा प्रकार गंभीर आणि वेदनादायी आहे", असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.