सोलापूर: कर्नाटकात नरेंद्र मोदीची जादू चालली नाही, त्यामुळे मोदी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. 2 हजाराची नोट ही फक्त काळा पैसा साठवण्यासाठी होती, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इतर मुद्द्यांवरुनही मोदी सरकारवर निशाणा साधला.
देशात बदल घडतोय हे कर्नाटकच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. कर्नाटकच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना मोदींनी आपली जादू चालवण्याचा प्रयत्न केला, बंगळुरुत कित्येक किमीचा रोड शो, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केलं, मात्र त्यांची जादू काही चालली नाही. देशातील वातावरण आता बदलत आहे. नरेंद्र मोदी आता गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. पुढच्या तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काय करायचं? लोकसभेच्या वेळी काय करायचं? या चिंतेत आहेत. गोंधळलेल्या अवस्थेतूनच केंद्रातल्या मंत्रिमंडळात बदल केला, असंही ते यावेळी म्हणाले.
चव्हाण पुढे म्हणतात, सरकारने दोन हजारांच्या नोटा वितरणातून बंद केल्या, पण या नोटा आणल्याच कशाला होत्या? दोन हजारांची नोट काही कुणी भाजीपाला खरेदीसाठी वापरत नाही. दोन हजारांच्या नोटा या फक्त काळा पैसा साठवण्यासाठी वापरल्या जात होत्या. नोटबंदीमध्ये देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, त्यानंतर कोव्हिड आला आणि अजूनही अर्थव्यवस्था संकटात आहे. धर्मांधतेच्या आधारावर भाजपाचे लोक आता काय काय करतील हे माहित नाही. येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, त्या निवडणुकाही आपल्याला जिंकायच्या आहेत, असंही आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी म्हटलं आहे.