PM Modi in Mumbai Nesco ( Marathi News ) : मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण २९,४०० कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे तोंडभरून कौतुक केले. "महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्याचा विकसित भारत घडवण्यात मोठा वाटा आहे. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्राचे वर्तमान सशक्त आहे. महाराष्ट्राला समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्राची विकसित भारत घडवण्यात मोठी भूमिका आहे."
१० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार
पुढे पंतप्रधान म्हणाले, "आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आसपासच्या भागांची कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल. रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांव्यतिरिक्त , महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्य विकासासाठी २-३ आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारनेही या प्रकल्पाला मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे येथे १० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत."
"२१व्या शतकातील भारताच्या आकांक्षा सध्या खूप उच्च पातळीवर आहेत. या शतकात जवळपास २५ वर्षे उलटून गेली आहेत. देशातील जनतेला सतत वेगवान विकास हवा आहे. येत्या २५ वर्षांत भारताचा अधिक वेगाने विकास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यानुसार देशात विकासकामे होत राहतील," अशा शब्द त्यांनी मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेला दिला.
इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवर्सचेही उद्घाटन
इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवर्सच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "इंडियन न्यूजपेपर सोसायटी स्वातंत्र्यापूर्वीपासून अस्तित्वात आहे. देशाच्या प्रवासातील प्रत्येक चढ-उतार तुम्ही जवळून पाहिले आहेत, ते जगले आहेत आणि लोकांना सांगितले आहेत. एक संघटना म्हणून तुमचे काम जितके प्रभावी होईल तितका देशाला फायदा होईल. एक वेळ होती जेव्हा नेते उघडपणे म्हणायचे की डिजिटल व्यवहार भारतातील लोकांच्या आवाक्यात नाहीत. पण जग भारतातील लोकांचे चातुर्य आणि सक्षमता पाहत आहे. आज भारत डिजिटल व्यवहारात मोठे विक्रम मोडत आहे. यामुळे लोकांच्या राहणीमानात वाढ झाली आहे हे संपूर्ण जग मान्य करेल," असे पंतप्रधान मोदी यांनी ठणकावून सांगितले.