राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 03:51 PM2024-06-09T15:51:18+5:302024-06-09T15:52:13+5:30
राष्ट्रवादीच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये मंत्रिपदावरून वाद असल्याचाही रंगल्यात राजकीय वर्तुळात चर्चा
Devendra Fadnavis NCP, PM Modi oath taking NDA Government: गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका संपल्या, त्यानंतर ४ जूनला निकालही हात आले. त्यात भाजपप्रणित NDA ला बहुमत मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन टर्ममध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता मिळाली होती, पण यावेळी त्यांना मित्रपक्षांच्या साथीने सरकार चालवावे लागणार आहे. त्यामुळे NDA तील घटक पक्षांशी समन्वय साधूनच गोष्टी घडत आहेत. मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील पंतप्रधानपदाचा शपथविधी आज दिल्लीत होणार आहे. त्यात महाराष्ट्रातून भाजपाचे ५ आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक अशा ६ खासदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र एकही खासदाराला आज मंत्रिपदाची शपथ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात स्पष्ट शब्दांत माहिती दिली.
भारत है तैयार! 🇮🇳
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 9, 2024
अद्भुत, अलौकिक व गौरवान्वित करने वाले क्षण का साक्षी बनने के लिए...@narendramodi#NarendraModi#ModiAgain#Oathceremonypic.twitter.com/wDZ3wAf4X6
"राष्ट्रवादीला सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्रिपद-स्वतंत्र प्रभार अशी ती जागा होती. पण त्यांचा आग्रह असा होता की राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित आहे आणि ते याआधी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे राज्यमंत्री-स्वतंत्र प्रभार करता येणार नाही. पण जेव्हा युतीचे सरकार असते तेव्हा काही निकष तयार केलेले असतात. एका पक्षाकरता ते निकष बदलता येत नाहीत. त्यामुळे मला विश्वास आहे की जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा त्यांचा विचार नक्की केला जाईल," असे फडणवीसांनी स्पष्ट सांगितले.
"आताही आमच्याकडून समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्यांनीच सांगितले की यावेळी शक्य नसल्यास पुढच्या वेळी द्या, पण आम्हाला राज्यमंत्रिपदाऐवजी मंत्रिपद द्या," अशी माहितीदेखील फडणवीस यांनी दिली.
"महाराष्ट्रातून काही अनुभवी आणि काही युवा खासदारांना मोदींच्या NDA सरकारमध्ये संधी मिळाली आहे. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांसह शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे सर्व जण मंत्रिमंडळात येत आहेत याबद्दल मला आनंद आहे. या सर्वांचे अभिनंदनही करतो," असेही फडणवीस म्हणाले.
ऐतिहासिक क्षण के लिए बस कुछ घंटे और 🪷
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 9, 2024
जब तीसरी बार ये आवाज़ गूंजेगी,
मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…@narendramodi#ModiAgain#oathceremony#Delhipic.twitter.com/eVx05oUVm2
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तटकरे-प्रफुल पटेल यांच्यात वाद असल्याची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ४ पैकी केवळ १ खासदार निवडून आणता आला. त्यामुळेच अजितदादा गटात राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल आणि लोकसभेचे खासदार सुनील तटकरे अशा दोन खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री कोण होणार यावरून वाद झाल्याचे काही सुत्रांनी सांगितले. दोघांनाही केंद्रात मंत्रिपद हवे असल्याने तटकरेंच्या दिल्लीतील बंगल्यावर यांच्यात चर्चा झाली. पण त्यावर तोडगा न निघाल्यानेच भाजपाकडून ऑफर मिळूनही या शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या खासदाराला मंत्र्यांच्या अंतिम यादीत स्थान मिळाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचाच फटका त्यांना बसला असल्याचेही बोलले जात आहे.