"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 06:53 PM2024-11-13T18:53:18+5:302024-11-13T18:56:18+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना थेट आव्हान दिले आहे...
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचा जबरदस्त आखाडा रंगला आहे. नेतेमंडळी प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आणि आव्हान-प्रतिआव्हान देतानाही दिसत आहेत. यातच आज, भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना थेट आव्हान दिले आहे. राहुल गांधी, कान उघडे ठेऊन ऐका, 'डंके की चोट पर' पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्फचा कायदा बदलणार. आता तुम्ही कुणाच्याही भूमीवर कब्जा करू शकणार नाही." शाह धुळ्यात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
"चारशे-चारशे वर्षांची जुनी मंदिरंही वक्फची संपत्ती झाले..." -
शाह म्हणाले, "या देशात, अनेक लोक वक्फ कायद्यामुळे त्रस्त आहेत. नुकतेच कर्नाटकात, तेथील वक्फ बोर्डाने निर्णय केला की, अनेक गावे, संपूर्ण वक्फची संपत्ती आहेत. चारशे-चारशे वर्षांची जुनी मंदिरंही वक्फची संपत्ती झाले, शेतकऱ्यांची शेतीही वक्फची संपत्ती झाली आणि लोकांची घरंही वक्फची संपत्ती झाले. मला सांगा हा वक्फचा कायदा बदलायला हवा की नको? जनतेतून आवाज आला 'हो...'."
"'डंके की चोट पर' PM मोदी वक्फचा कायदा बदलणार" -
शाह पुढे म्हणाले, "आमची बदलायची इच्छा आहे, एक विधेयक घेऊन आलो आहोत. पण हे राहुल गांधी आणि पवार विरोध करत आहेत. मी आज सांगून जात आहे. राहुल गांधी, कान उघडे ठेऊन ऐका, 'डंके की चोट पर' पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्फचा कायदा बदलणार. आता तुम्ही कुणाच्याही भूमीवर कब्जा करू शकणार नाही."
मुस्लीम आरक्षणावरूनही राहुल गांधींवर निशाणा -
मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शाह म्हणाले, "काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना हे सर्व उलेमा भेटले आणि म्हणाले, मुस्लिमाना आरक्षण द्यायला हवे. बंधू-भगिनींनो, जर मुसलमानांना आरक्षण द्यायचे असेल तर, एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणातून कापून द्यावे लागेल." यावेळी, धुळे करांनो आपण मुस्लीम आरक्षणासाठी सहमत आहात का? असा प्रश्न शाह यांनी जनतेला केला. यावर जनतेतून आवाज आला 'नाही...'. यावर, शाह म्हणाले, "राहुल गांधी, आज मी धुळ्यातून सांगून जात आहे, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी जरी आली तरीही मुस्लीम आरक्षण देऊ शकणार नाही."