मुंबई - कौटुंबिक मुलाखत द्यायची आणि इतरांना गद्दार म्हणायचं. २०१९ च्या निकालानंतर तुमच्याबाबत जनता हेच बोलत होती. माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील नव्हते मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीवर भाजपा नेत्यांनी तोंडसुख घेतले.
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना संपवायची आहे असाच आरोप ३५ वर्षापूर्वी हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत कोल्हापूरच्या सभेत शिवसेना नेत्यांनी शरद पवारांबाबत केला होता. शिवसेना मोडायचा, संपवायचा डाव शरद पवारांचा आहे. कोण कोणावर आरोप करतो याची सत्यता जनतेला पडताळायची असते. आजची मुलाखत रश्मी ठाकरेंचा सामना, त्याचे संपादक आणि पक्षप्रमुख अशी आहे. त्यामुळे ही कौटुंबिक मुलाखत आहे. यात कुठलेही अडचणीचे ठरतील असे प्रश्न विचारण्यात येणार नाही हे अपेक्षित होते. ही मुलाखत जनतेच्या मनात आपली प्रतिमा बनवण्याचा, सहानभुती मिळवण्याचा एक प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच विरोधी पक्ष हा संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा असं म्हणता. इतरांना गद्दार बोलता. मुलाखतीत म्हणता माझ्या वडिलांचे फोटो लावून मत मागितले. मग २०१९ मध्ये निवडणुकीत बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही फोटो होते. मोदी तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही फोटो का लावता? सूडाचं राजकारण नको म्हणता मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस, राणेंवर अजामीन पत्र गुन्हा दाखल केला. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार नाही असं म्हटलं तरी १४ दिवस जेलमध्ये टाकलं. सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून माजी सैनिकांचा डोळा फोडायचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद भाष्य काँग्रेसनं करूनही तोंडाला फेविकॉल लावून गप्प बसायचं असा टोलाही भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला.
काय झाडी, काय डोंगर...; उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांना विचारला खोचक सवाल
दरम्यान, हुकुमशहाचं राजकारण गेली अडीच वर्ष महाराष्ट्र पाहत होता. जनता सार्वभौम्य आहे. जनतेच्या मनाविरोधात तुम्ही गेला. मग तेव्हा राजीनामे का दिले नाहीत? जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीचे ९८ निवडून दिले त्यांना तुम्ही सत्तेत बसवलं. चुकीच्या माणसांची बाजू घेऊन त्यांना प्रोत्साहित करत होता. आईनं मुलासाठी स्वयंपाक केला अशी बातमी कधी होऊ शकत नाही. मात्र हे एकमेव मुख्यमंत्री होते जे मंत्रालयात गेल्यानंतर बातमी होते. सहानुभूती घेण्याचा प्रयत्न हा राजकीय डाव आहे. कौटुंबिक मुलाखत द्यायची आणि इतरांना खंजीर खुपसला, गद्दार म्हणायचं हे मनसोक्त म्हणायचं असंही भाजपाने सुनावलं
मुंबईत पराभूत व्हावं लागेलमुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना पराभूत व्हावेच लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला. भाजपाशी साथ सोडली तेव्हा किती हजार कोटी खर्च झाले? जनतेच्या मनात खूप प्रश्न आहेत त्यामुळे त्याची उत्तरं मिळालीच नाही असा टोलाही भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.