Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काल(29 ऑक्टोबर 2024) उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आता राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपने आपली निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी अन् इतर बडे नेते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.
पंतप्रधान मोदी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण आठ सभा घेणार आहेत. तर, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे राज्यात जास्तीत जास्त जाहीर सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील महाराष्ट्रात एकूण 15 जाहीर सभा घेणार आहेत.
महाराष्ट्रात कोणाच्या किती सभा होणार?पंतप्रधान नरेंद्र मोदी - 8अमित शहा - 20नितीन गडकरी - 40देवेंद्र गडकरी - 50चंद्रशेखर बावनकुळे - 40योगी आदित्यनाथ - 15
प्रामुख्याने दोन आघाड्या मैदानात समोरासमोर महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. यावेळी महाराष्ट्र निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने आहेत. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच आहे.
20 नोव्हेंबर रोजी मतदानमहाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. गेल्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेने एनडीएपासून फारकत घेत राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
पुढे, जून 2022 मध्ये शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झाला होता आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या 40 आमदारांसह बंड पुकारले. पुढे भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर, गेल्या वर्षी अजित पवारदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन महायुतीत सामील झाले. आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट आहेत.