मुंबई - राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवारच भाजपच्या गळाला लागले असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. ज्या अजित पवारांवर भाजप नेत्यांकडून भ्रष्टाचाराच्या मुद्दावर जोरदार टीका करण्यात येत होती, तेच अजित पवार आता भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आज सकाळी मोठ्या घाईने उरकून घेण्यात आला. यावेळी भाजपचे काही निवडकच नेते उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी हजेरी लावली होती. त्यानंतर काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले. या ट्विटनंतर मोदींचे चार वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारे ट्विट केले होते. ज्यामध्ये ते म्हणाले होते की, एनसीपी म्हणजे नॅच्युरल करप्टेड पार्टी. त्यांच्या घड्याळातील 10 वाजल्याचा आकडा दहा वर्षात दहा घोटाळे केल्याचे दर्शवते. आता त्याच एनसीपीचे प्रमुख नेते भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील मोदींचे दोन्ही ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.