Pm Narendra Modi at Nagpur Samruddhi Highway: महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेणारा महामार्ग अशी ओळख करून देणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात हा सोहळा पार पडला. याशिवाय, यासोबत जवळपास ७५ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडले. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक स्वागताचा अतिशय उत्स्फूर्तपणे स्वीकार केला. ढोलवादनाचाही आनंद घेतला. तसेच, नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) जोडीचं तोंडभरून कौतुक केलं. याच वेळी पंतप्रधान मोदी यांनी भारताबद्दलच्या एका पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टीचा विशेष उल्लेख केला. जाणून घेऊया नक्की काय म्हणाले PM मोदी...
"भारतात पहिल्यांदाच असं घडतंय की जे सरकार अस्तित्वात आहे, त्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्पांना मानवी भावनांची जोड दिली आहे. सरकारचे लक्ष सर्वांगीण विकास आणि दृष्टिकोनासह पायाभूत सुविधांचा विकास असे आहे. राज्यांच्या प्रगतीमुळे या ‘अमृत काळा’मध्ये राष्ट्राच्या विकासाला बळ मिळेल. सातत्याने होणार वाढ आणि विकासासाठी दीर्घकालीन दृष्टी महत्त्वाची आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की औद्योगिक क्रांतीच्या चौथ्या टप्प्याचा भारत नक्कीच योग्य पद्धतीने वापर करेल. भारतीय ती संधी गमावणार नाही, कारण अशा संधी पुन्हा येणार नाहीत," असे अतिशय स्पष्ट शब्दांत पंतप्रधानांनी समृद्धी महामार्ग, विकासाचे राजकारण आणि उद्योग जगतातील वेगाने घडणारे बदल यावर भाष्य केले.
समृद्धी महामार्गाची विशेष बाब म्हणजे, याच्या दुतर्फा वनराई आणि हिरवेगार जंगल आहे. तसेच, अनेक ठिकाणी ओव्हरब्रिज किंवा अंडरब्रिज करून वन्यजीवांची व पर्यावरणाचीही काळजी घेण्यात आली आहे. त्याउद्देशाने मानवी भावनांची जोड दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय, विरोधकांवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. देशाच्या राजकारणात काही पक्ष 'शॉर्टकट' घेत आहेत. त्या पक्षांपासून दूर राहा आणि स्वार्थी नेत्यांना उघडं पाडण्याचं काम आता जनतेनं करायला हवं, असे मोदी म्हणाले.
'शॉर्टकट' पक्षांवर मोदींची सडकून टीका
"देशातील करदात्यांचे पैसे लुटायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हे लक्ष्य ठेवणारे पक्षच देशाचे सर्वात मोठे शत्रु आहेत. 'आमदनी अठ्ठनी अन् खर्चा रुपया' करणारे राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. देशाता अशा वाईट नितीपासून वाचवलं पाहिजे. काही पक्ष वैयक्तिक स्वार्थासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेला नेस्तनाबूत करण्याचं काम करत आहेत. शॉर्टकट पक्षांनाही माझं आवाहन आहे की स्थायी विकासाचं महत्व समजून घ्या. देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी भविष्याचा विचार होणं गरजेचं आहे. पुढच्या २५ वर्षांच्या विकासाच्या व्हिजननं सरकार काम करत आहे. पण काही पक्ष स्वत:च्या फायद्यासाठी देशाचं नुकसान करत आहेत. आता अशा नेत्यांना उघडं पाडण्याचं काम जनतेनंच सुरु करावं", अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.