पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा, असं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी 'मी चहावाला' या वक्तव्यावर भाष्य केलं. उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात प्रल्हाद मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना सामूहिकरित्या जीएसटी भरण्यासही नकार द्या, म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील असं वक्तव्य केलं.
"आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर असेल त्यांच्यावर चहा विकायची जबाबदारी असायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चहावाल्याची मुलं’ आहोत, असं प्रल्हाद मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चहावाला' असं म्हटलं जातं, परंतु म्हणायचं असल्यास त्यांना चहावाल्याचा मुलगा म्हणा असंही त्यांनी नमूद केलं.
... तर मोदीही तुमच्याकडे येतील"सामूहिकरित्या GST भरायला नकार द्या. मग केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधाननरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील. निर्वासित म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचे बळ दाखवा आणि आता लढायला शिका," असं प्रल्हाद मोदी म्हणाले. तुमच्या शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचे लक्ष वेधायचे असेल, तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या, मग केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाही, तर पंतप्रधान मोदीही तुमच्याकडे येतील, असे प्रल्हाद मोदी यांनी सांगितले.