"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:06 PM2024-10-09T16:06:52+5:302024-10-09T16:09:57+5:30
"काँग्रेसचा फॉर्म्युला फोडा आणि राज्य करा, असा आहे. त्यांच्या कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांनाही भडकावले."
हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपचे लक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) डिजिटल माध्यमाने महाराष्ट्रात 7600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेसचा फॉर्म्युला फोडा आणि राज्य करा, असा आहे. त्यांच्या कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांनाही भडकावले."
काँग्रेसने समाजात फूट पाडल्याचा आरोप -
पीएम मोदी म्हणाले, "काँग्रेस पूर्णपणे संप्रदाय आणि जातीच्या आधारावर निवडणूक लढते. हिंदू समाजात फूट पाडणे आणि त्याला विजयाचा फॉर्म्युला बनवणे, हाच काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आहे. काँग्रेस 'सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय' या भारताची परंपरेचे दडपत आहे. हे सनातन परंपरेला दडपत आहेत."
मोदी पुढे म्हणाले, "हिंदूंमधील एका जातीचे दुसऱ्या जातीशी भांडण लावणे, हेच काँग्रेसचे धोरण आहे. हिंदूंमध्ये जेवढी फूट पडेल, त्यांना तेवढाच फायदा होईल, हे काँग्रेसला माहीत आहे. काँग्रेसला कुठल्याही प्रकारे हिंदू समाज पेटवत ठेवायचा आहे. म्हणजे त्यांना त्यावर राकीय पोळ्या भाजता येतील. भारतात कुठेही निवडणुका असोत, तेथे काँग्रेस हाच फॉर्म्युला वापरते."
"महाराष्ट्रातील जनतेने भाजपला मतदान करावे" -
महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करत मोदी म्हणाले, "मला पूर्ण विश्वास आहे की, जे लोक आज समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. असा प्रत्येक प्रयत्न महाराष्ट्रातील जनता हाणून पाडेल. महाराष्ट्रातील जनतेने देशातील विकास सर्वोपरी ठेवून संघटित होऊन महायुतीला मतदान करायला हवे."
यावेळी पंतप्रदान मोदी यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला ते म्हणाले, "काँग्रेसने तरुणांना टार्गेटकेले आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भडकवण्याचा प्रयत्नकेला. मात्र, हरियाणातील तरुण, आपल्या बहिणी आणि मुली त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपवर विश्वास ठेवत आहेत."