मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज ६१ वा वाढदिवस आहे. राज्यात सध्या अनेक संकटांची मालिकाच सुरू असल्याचे दिसत आहे. कोरोनाचे संकट ओढावलेले असताना आता अतिवृष्टीने राज्यभर थैमान घातलं आहे. अनेक दुर्घटनांमध्ये कित्येकांना जीवदेखील गमावावा लागला. या सर्व संकटांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या समर्थकांना वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन अनेक मान्यवर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना चित्र पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळच्या सुमारास ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला दिर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो,” असं अजिंक्यनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यावर एकामागून एक येणाऱ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कालच केली. “कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही २७ जुलै रोजी येणारा माझा वाढदिवस साजरा करू नये.”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.