मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल राजस्थानच्या बिकानेरमध्ये सभेला संबोधित करताना काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेस ही ‘लुट की दुकान’ आणि ‘झूठ का बाजार’ असल्याचे म्हटले होते. त्यांची ही खोचक टीका राहुल गांधी यांच्या 'मोहब्बत की दुकान' कॅम्पेनला उद्देशून होती. आता पीएम मोदींच्या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मीडियाला प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: 'झूट का बाजार' आहेत, आता हे देशातील जनतेपासून लपून राहिले नाही. मोदींकडे सध्या गोदी मीडिया आहे, या माध्यमातून त्यांना जेवढं फेकायचं असेल, त्यांनी तेवढं फेकावं. मूळात ते काँग्रेसबद्दल बोलत नव्हते तर ते स्वत:बद्दल बोलत होते".
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी? भ्रष्टाचारात राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रातून पाठवलेला पैसा काँग्रेसच्या तावडीत येतो. काँग्रेस हा असा पक्ष आहे की, जो सत्तेत राहून देश उद्ध्वस्त करतो आणि सत्तेतून बाहेर पडल्यावर देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करतो. भारतीय सैन्य सर्जिकल स्ट्राइक करते, तेव्हा काँग्रेसचे लोक पुरावे मागतात. त्यांना सैन्याचे काम आवडत नाही. राजस्थानची भूमी ही सैनिकांची भूमी आहे, त्याचीही बदनामी करतात. काँग्रेस ही ‘लुट की दुकान’ आणि ‘झूठ का बाजार’ आहे, अशी टीका मोदींनी केली होती.