नवी दिल्ली: इटली आणि स्कॉटलंडचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. आज सकाळी पंतप्रधान मोदी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. आज पंतप्रधान मोदी ४० पेक्षा अधिक जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्रासह मणिपूर, झारखंडसह इतर राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित असतील. लसीकरणात पिछाडीवर पडलेल्या जिल्ह्यांमधील स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येईल. दुपारी १२ वाजता ही बैठक होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लसीकरणासंदर्भात पंतप्रधानांनी अनेकदा देशवासीयांशी संवाद साधला आहे. कोरोनाचं संकट संपवायचं असल्यास लसीकरण हाच पर्याय आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पुढे या, असं आवाहन मोदींकडून अनेकदा करण्यात आलं आहे. मात्र तरीही देशातील ४० हून अधिक जिल्ह्यात लसीकरणाचा वेग फारसा नाही. त्यामुळेच या जिल्ह्यांमध्ये आता पंतप्रधान लक्ष घालणार आहेत. या जिल्ह्यांत आतापर्यंत ५० टक्के लसीकरणही झालेलं नाही.
देशातील ४८ जिल्ह्यांमधील लसीकरणाची स्थिती गंभीर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या लोकांचं प्रमाण ५० टक्क्यांच्या खाली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या ४८ जिल्ह्यांपैकी २७ जिल्हे ईशान्येकडचे आहेत. यामध्ये मणिपूर आणि नागालँडमधील प्रत्येकी ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. ईशान्याकडील दर ५ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या यादीत झारखंडच्या ९, तर महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील कोणते जिल्हे पिछाडीवर?औरंगाबाद, नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड आणि अकोला.