बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:18 PM2024-11-14T17:18:51+5:302024-11-14T17:19:33+5:30

"एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त अन् दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचे गुणगान गाणारे..."

PM Narendra Modi in Chhatrapati Sambhajinagar "We fulfilled Balasaheb's wish", | बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

PM Narendra Modi in Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेतून पीएम मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रातील ही निवडणूक केवळ नवीन सरकार निवडण्यासाठीची निवडणूक नाही, या निवडणुकीत एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त आहेत, तर दुसरीकडे औरंगजेबाचे गुणगान करणारे आहेत," असा घणाघात मोदींनी केला.

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली
"औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी सर्वप्रथम दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होते, पण काँग्रेसच्या दबावाखाली या लोकांची नाव बदलण्याची हिंमत झाली नाही. महायुतीचे सरकार सत्तेवर येताच शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आम्ही पूर्ण केली," असा हल्लाबोल मोदींनी केला.

नामकरणाविरोधात हे लोक न्यायालयात गेले 
मोदी पुढे म्हणाले, "मी एकनाथ शिंदे सरकारला धन्यवाद देतो की, त्यांनी शहराचे नामकरण केले. संभाजीनगरची भूमी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगणारी भूमी आहे. याच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर काँग्रेस आणि आघाडीला दणका बसला. त्यामुळेच हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांचे नेते न्यायालयात गेले. या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांना मारणाऱ्यांमध्ये आदर्श दिसतो. ते महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहेत." 

महायुती सरकारने मराठवाड्यात पाणी आणले
"विठ्ठलाच्या भक्तांच्या सोयीसाठी आम्ही पालखी महामार्ग तयार केला आहे. आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या समस्या वाढवण्याशिवाय काहीही केले नाही. मराठवाड्यात अनेक दिवसांपासून पाण्याचे संकट आहे, पण काँग्रेस आणि आघाडीचे लोक नेहमीच निष्क्रिय राहिले. महाविकास आघडीवाले पाण्याच्या थेंबा-थेंबसाठी अडचणी आणल्या. आपल्या सरकारमध्ये पहिल्यांदाच दुष्काळाविरुद्ध ठोस प्रयत्न सुरू झाले. वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातून मराठवाड्याला पाणी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार योजना सुरू केली. त्यामुळे जल स्थर वाढला होता. पण मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकाने पाणी योजना रोखल्या, जळ्युक्त शिवाराची योजना थांबवली," अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडी
पीएम मोदी यांनी यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेसला वाटत होते की, ओबीसी आपापल्या जातींमध्ये विभागले जातील आणि या वर्गाची ताकद कमी होईल. या विचारानेच काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा विचार करत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण बंद करेल. काँग्रेसचे राजकुमार परदेशात उघडपणे आरक्षण रद्द करणार असल्याचे सांगतात. काँग्रेस आणि आघाडी एससी, एसटी आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कट रचत आहे. काँग्रेसचा अजेंडा आजही तोच आहे त्यामुळे गेली 10 वर्षे ओबीसी समाजाचे पंतप्रधान होणे त्यांना सहन होत नाही," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: PM Narendra Modi in Chhatrapati Sambhajinagar "We fulfilled Balasaheb's wish",

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.