ठाणे : राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ऑक्टोबर रोजी कर्करोग रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभाकरिता ठाण्यातील साकेत येथे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने शिंदे गट व मुख्यत्वे भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.
ठाणे महापालिकेला रुस्तमजी गृहसंकुलातील भूखंड टाऊन सेंटरच्या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला. माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याठिकाणी बिझनेस हब सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांची बदली झाली आणि हे प्रकरण थांबले. कोरोना वाढल्याने या टाऊन सेंटरच्या ठिकाणी ग्लोबल कोविड सेंटर सुरू करण्यात आले. कोरोना कमी झाल्यानंतर याच ठिकाणी बाजूचा भूखंड घेऊन टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आणि जितो या संस्थेच्या माध्यमातून कर्करोग रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाचा प्रारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी जितो या संस्थेने पंतप्रधान कार्यालयासोबत पत्रव्यवहार केला.