अहमदनगर: दिवंगत माजी केंद्रीय मंत्री व राज्यातील मात्तबर नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीनं संपन्न झालं. विखे पाटील यांच्या सहकार क्षेत्रातल्या कामाचं, जलसंवर्धन, ग्रामीण शिक्षणासाठी केलेल्या कामाचं यावेळी पंतप्रधान मोदींनी तोंडभरुन कौतुक केलं. विखे पाटील यांनी सत्तेतून, राजकारणातून समाजहित साधलं, अशा शब्दांत मोदींनी विखे पाटलांच्या कार्याचं कौतुक केलं.बाळासाहेब विखे-पाटील आयुष्यभर गाव, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी राबले. त्यांचं आयुष्य येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी आहे. विखे पाटील यांनी सहकारासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अतिशय जवळून पाहिल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या कष्टांमुळेच ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला, असं मोदींनी म्हटलं.सहकार चळवळ आणि धर्मनिरपेक्षता यावरही मोदींनी भाष्य केलं. 'सहकार चळवळ ही खरी धर्मनिरपेक्ष असल्याचं विखे पाटील म्हणायचे. सहकार चळवळ कोणत्याही जातीधर्माची बटिक नाही. सगळ्या समाजाला या चळवळीनं प्रतिनिधित्व दिलं आहे, हे विखे पाटील यांचे शब्द होते. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे आणि ही चळवळ सगळ्यांची आहे,' असं प्रतिपादन मोदींनी केलं.विखेंच्या आत्मचरित्राला देण्यात आलेलं देह वेचावा कारणी हे नाव अत्यंत समर्पक आहे. विखेंच्या आयुष्याचं संपूर्ण सार या नावात आहे. सत्ता, राजकारणाचा वापर विखेंनी समाजाच्या कल्याणासाठी केली. त्यांच्यासाठी सत्ता ही लोककल्याणाचं माध्यम होती. देशात कुठेही ग्रामीण शिक्षणाची चर्चा नसताना त्यांनी ग्रामीण शिक्षणासाठी पुढाकार घेतला. अविरत प्रयत्न केले. प्रवरा संस्था उभारली. संस्थेच्या माध्यमातून तरुणांना रोजगार दिला. त्यांनी कायम समाजाच्या भल्याचा विचार केला, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विखेंच्या कार्याची स्तुती केली.प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सोहळ्याला हजर राहिले. यावेळी त्यांनी विखेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.