पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दडपण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 03:56 PM2023-03-19T15:56:55+5:302023-03-19T16:01:38+5:30

काँग्रेस पक्ष अदानी मोदींचे काळे सत्य देशासमोर आणणारच, पटोले यांचं वक्तव्य

pm narendra Modi s attempt to suppress Rahul Gandhi s voice by bringing in police will not succeed congress leader Nana Patole | पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दडपण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही: नाना पटोले

पोलिसांना पुढे करून राहुल गांधींचा आवाज दडपण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही: नाना पटोले

googlenewsNext

“उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुल गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुलजींसह आम्ही आवाज उठवत राहू,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

“अदानी समूहाच्या महा घोटाळ्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेची लाखो कोटी रुपयांची स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी मधील गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहाचे शेअर कोसळल्याने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राहुल गांधी यांनी अदानी समूहाच्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली पण सरकार चौकशी करण्याऐवजी ४५ दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर नोटीस पाठवून चौकशीसाठी त्यांच्या घरी पोलीस पाठवत आहे ही हुकुमशाहीच आहे,” असे पटोले म्हणाले. 

अदानी समूहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा काळा पैसा परदेशातून गैरमार्गाने गुंतवल्याचे समोर आले आहे. पण नरेंद्र मोदी सरकार या घोटाळ्याची चौकशी करत नाही. खासदार राहुल गांधी यांनी यासंदर्भात संसदेत आवाज उठवला, पण सरकारने त्यांच्या भाषणाचा निम्म्याहून अधिक भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकला. विरोधी पक्षांनी सातत्याने मागणी करूनही सरकार अदानी घोटाळ्याबाबत संसदेत चर्चा का करत नाही. अदानी समूहाशी मोदी सरकारचे नेमके काय संबंध आहेत जे चौकशीतून बाहेर येतील म्हणून सरकार चौकशीला घाबरत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

अदानींचे साम्राज्य विस्तारले
“केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून अदानींचे साम्राज्य रॉकेट स्पीडने विस्तारात गेले. बंदरे, विमानतळ,विद्युत वितरण, कोळसा, सिमेंट, रेल्वे, खाद्य तेल, अन्न पुरवठा, डेटा सेंटर, माध्यमे अशा अनेक क्षेत्रात अदानी कंपन्यांना केंद्र सरकारच्या पाठबळाने विस्तार करता आला. अवघ्या काही वर्षांमध्ये अदानी समूहाच्या संपत्तीमध्ये लाखो कोटी रुपयांची वाढ झाली. करोना काळात जगभरातील उद्योग ठप्प असतानाही अदानी समूहाच्या संपत्ती मात्र  प्रचंड वेगाने वाढली. केंद्रातील सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूहाने देशाच्या संपत्तीवर मोठ्या प्रमाणात कब्जा केला आहे. अदानी आणि मोदींच्या अभद्र युतीने देशाच्या मालकीची साधन संपत्ती अदानी समूहाला दिल्याचे राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणल्यामुळे मोदी सरकार घाबरलेले असून राहुल गांधी यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण सरकारला त्यात यश येणार नाही. राहुलजी गांधी तपस्वी, निडर योद्धे असून ते अदानी आणि मोदी यांचे काळे सत्य जनतेसमोर मांडत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Web Title: pm narendra Modi s attempt to suppress Rahul Gandhi s voice by bringing in police will not succeed congress leader Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.