PM Narendra Modi Maharashtra Visit: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात जनसभांना संबोधित करून अनेकविध ठिकाणी रोड शो, रॅली करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दिंडोरी आणि कल्याण येथे एका सभेला संबोधित केल्यानंतर उत्तर पूर्व मुंबई येथे एक रोड शो करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी होणार आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे आणि पालघर या मतदारसंघात या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. १८ मे रोजी या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होणार असल्याने प्रचाराला वेग आला आहे. भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, दुपारी पंतप्रधान मोदी दिंडोरी येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी कल्याण येथे प्रचारसभा घेणार आहेत.
कल्याण सभेनंतर उत्तर पूर्व मुंबईत होणार रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी उत्तर पूर्व मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या माध्यमातून भाजपा जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. या रोड शोची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी येथून पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोची सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या रोड शो मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यावर असणार आहेत. अमित शाह सकाळी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. यानंतर अमित शाह ओडिशाला रवाना होतील. ओडिशामध्ये निवडणूक प्रचारसभा आणि रोड शो होणार आहे.