मोदींविरोधात राष्ट्रवादी करणार आंदोलन, पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली तंबी, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 12:02 PM2022-02-26T12:02:42+5:302022-02-26T12:03:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आल्यानंतर त्यांचा मान सम्मान ठेवलाच पाहिजे असं अजित पवार म्हणाले आहेत.
पुणे – महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजपाविरोधात आंदोलन सुरू आहे. आता येत्या मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. यासाठी राष्ट्रवादीनं गो बॅक मोदी अशा स्वरुपाचं आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येतेय. परंतु त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.
अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, विरोधकांचे कुरघोडीचं राजकारण सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. पहाटे ट्विट करुन कारवाईची माहिती कशी देऊ शकतात. नवाब मलिक(Nawab Malik) प्रकरणावर स्वत: शरद पवार, मुख्यमंत्री बोललेत त्यामुळे मला बोलायचं नाही. नेमका काय प्रकार सुरू आहे. मलिकांना अटक झाली. त्यातून जनतेने बोध घ्यावा. मलिकांनी त्यांची भूमिका आधीच मांडली आहे. सूडाचं राजकारण कुठवर करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असा अजित पवारांनी भाजपला नाव न घेता टोला लगावला.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) पुण्यात आल्यानंतर त्यांचा मान सम्मान ठेवलाच पाहिजे. काय निदर्शनं असतील ते दुसऱ्या ठिकाणी केली जावीत. मेट्रोला राज्याने पण पैसे दिलेत. पुणे शहर राष्ट्रवादी मोदी गो बँक घोषणाबाजी करणार आहे ती पक्षाची भूमिका आहे आणि मी उपमुख्यमंञी सरकारची भूमिका मांडलीय. मी कितीवेळा सांगितले सर्वांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे ही आपली संस्कृती नाहीये. दोन्ही बाजुनी हे थांबलं पाहिजे असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दुसरीकडे आंदोलन करण्याची तंबी दिली आहे.
मराठी पाटी लावायला अडचण काय?
राज्यात मराठी पाट्या लावायला काय अडचण आहे. मराठी पाटा लावावी त्याला काय समस्या आहेत. मराठी भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे. आपल्या माय मराठीला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे. त्यासाठी सुभाष देसाई दिल्लीला गेलेत. आता आम्ही मराठी भाषा भवन पण बांधतोय असंही अजित पवारांनी सांगितले.
यूक्रेनमधील मुलांना आणण्याचा प्रयत्न
जगात सध्या तिसरं महायुद्ध होतंय का अशी परिस्थिती आहे. हे थांबलं पाहिजे. तिकडं वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेली सर्व मुलं आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज आपली दिल्लीत ३२ मुलं येताहेत. मुंबईतही एक विमान येतंय. त्यातही आपली मुलं आहेत अशी माहिती अजित पवारांनी दिली.