मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून आणि ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांसाठी उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केले आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो", असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याचबरोबर, त्यांनी पत्रही पाठवले आहे. त्यामध्ये "वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे" असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांसाठी उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, "माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील काळात देशाच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान असावे यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील याचा पूर्ण विश्वास वाटतो."
दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यालय किंवा मातोश्री या निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नका. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करु नका आणि फलक लावू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.