मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी खातेदारांना दिलासा देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे.पीएमसी बँक प्रकरणी मुंबई कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. पीएमसीबाबत राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी. पीएमसी बँकेचे दुसऱ्या मोठ्या बँकेमध्ये विलीनीकरण करावे किंवा ज्या प्रकारे राष्ट्रीयीकृत बँकांना रिव्हायव्हल पॅकेज दिले जाते, त्याप्रमाणे पीएमसी बँकेलाही पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी केली. खातेदारांना दिलासा देण्यासाठी त्वरित पावले उचलून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसने केली.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात भाई जगताप, चरणसिंग सप्रा, गणेश यादव, झिशान सिद्दीकी आदी नेत्यांचा समावेश होता. याबाबत एकनाथ गायकवाड म्हणाले, आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्याने १६ लाख खातेधारकांची परवड सुरू झाली आहे.बँकेत जमा असलेल्या स्वत:च्या पैशांसाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. ११ खातेदारांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे व लाखो खातेदार दडपणाखाली जगत आहेत. पण अजूनही त्यांना न्याय मिळत नाही. नियमबाह्य पद्धतीने एचडीआयएलसारख्या कंपन्यांना लाखोंचे कर्ज देण्यात आले. याला सर्वस्वी पीएमसी बँकेचे मॅनेजमेंट व आरबीआयचे आॅडिटर्स जबाबदार आहेत. जाणूनबुजून त्यांनी ११ वर्षे या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर आम्ही आज राज्यपालांची भेट घेत उपाययोजना करण्याची मागणी केली.
'पंतप्रधानांनी पीएमसी बँक प्रकरणी हस्तक्षेप करावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 2:48 AM