पुणे : गणेशोत्सव काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पीएमपीकडून सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमुळे उत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत पीएमपीला तब्बल १६ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या गणेशोत्सवाच्या कालावधीपेक्षा हे उत्पन्न तब्बल ४४ लाखांनी अधिक आहे. २९१५ च्या गणेशोत्सवात या दहा दिवसांच्या कालावधीत पीएमपीला सुमारे १६ कोटी २० लाख ५९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा पीएमपीने सुमारे ६२२ जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच शहरात कोठेही फिरण्यासाठी अवघ्या ५० रुपयांच्या दरात पास उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांकडून पीएमपीला प्रतिसाद दिला जात असल्याचे चित्र आहे.पीएमपीकडून ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीसाठी नियमित संचलनाबरोबरच ६२२ जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या, प्रवाशांची गर्दी आणि त्यांच्या मागणीनुसार, शहरातील १३ डेपोंमधून या गाड्या सोडण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने सकाळच्या वेळी या जादा गाड्या सोडण्यात आल्या, तसेच ज्या दिवशी रात्री १२ पर्यंत देखावे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्या दिवशी या जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे आपोआपच प्रवाशांची संख्या वाढल्याने पीएमपीला १० दिवसांत मागील वर्षीच्या तुलनेत ४५ लाखांचे जादा उत्पन्न मिळाले आहे. या दहा दिवसांमध्ये सर्वाधिक १ कोटी ८२ लाख रुपयांचे उत्पन्न रविवारी (दि. ११) मिळाले असून सर्वात कमी उत्पन्न गणेश आगमनाच्या पहिल्या दिवशी (दि. ५) रोजी १ कोटी ५ लाख रुपये मिळाले आहे.जादा बसमधून ८२ लाखांची कमाई गणेशोत्सवाच्या कालावधीत नियमित संचलनाव्यतिरिक्त ६२२ जादा बस सोडल्याने पीएमपीला गणेशोत्सवात सुमारे ८२ लाखांचे अतिरिक्त उत्पन्न मिळालेले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या शेवटच्या सात दिवसांमध्ये हे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०१५ मध्ये जादा बसच्या माध्यमातून प्रतिबस प्रतिफेरी ५२५४ रुपयांचे उत्पन्न पीएमपीला मिळाले होते. तर यंदा हे उत्पन्न प्रतिबस प्रतिफेरी ५५६३ रुपयांवर पोहोचले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमपीच्या उत्पन्नात ४४ लाखांची वाढ
By admin | Published: September 18, 2016 12:25 AM