मुंबई - 'पाणी कसं अस्त' या वादग्रस्त कवितेबद्दल नांदेड येथील कवी दिनकर मनवर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची माफी मागितली आहे. त्याचबरोबर ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. याच कवितेवरून वादग्रस्त लेखन करणारे औरंगाबादचे पत्रकार सुरेश पाटील यांनीही आयोगामार्फत समस्त महिलांची माफी मागितली आहे.
'पाणी कसं अस्त' या कवितेमध्ये श्री मनवर यांनी स्त्रियांबाबत जातिविषयक टिप्पणी केली होती. त्याविरुद्ध काही संघटनानी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याआधारे आयोगाने कवी मनवर, अभ्यासक्रमात त्या कवितेचा समावेश करणारे मुंबई विद्यापीठ आणि सुरेश पाटील यांना नोटिसा बजावल्या होत्या. कवी दिनकर मनवर यांनी आपल्या व्यक्तिशः हजर राहून दिलेल्या निवेदनात विशिष्ट ओळ लिहिताना तसेच लिहिण्याआधी आणि लिहिल्यानंतरही माझ्या कुणाच्याही भावनांशी खेळण्याचा किंवा कोणत्याही स्त्रीवर्गाची अवहेलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता व नाही असे म्हटले आहे. सदर कवितेतली माझ्या एका ओळीमुळे माझ्या बांधवांना व भगिनींना मानसिक क्लेश झाला. माझा काही हेतू नसताना या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या याचे मला अतिशय दुःख झाले आहे. त्याबद्दल मा आयोगासमोर मी मनापासून माफी मागतो असे स्पष्ट केले आहे. या कवितेमागची, वादग्रस्त ओळीबाबतची भूमिका त्यांनी मांडली आहे.
महाराष्ट्र राज्य आयोगाने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना कवी मनवर यांची कविता अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई विद्यापीठाचे निबंधक श्री सुनील भिरूड, तसेच मराठी अभ्यास मंडळाचे निमंत्रक डॉ सिसिलिया कार्व्हालो यांच्यासह मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी आयोगापुढे उपस्थित राहत सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे कि, विद्यापीठाच्या कला शाखा तृतीय वर्ष मराठी विषयाच्या 'अभ्यास पत्रिका - ६ साहित्य आणि समाज' या मध्ये दिनकर मनवर यांच्या कवितेचा महानगरीय जाणिवेचे साहित्य म्हणून अभ्यासक्रमात २०१८-१९ ते २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी समावेश करण्यात आला होता मात्र यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने दिनकर मनवर यांनी समाज माध्यमाद्वारे माफी मागितली आहे. अभ्यास मंडळ ही यास सहमत असून मुंबई विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरेचा विचार करून विद्यापीठाच्या परंपरेला कुठलेही गालबोट लागू नये तसेच सामाजिक सलोखा अबाधित रहावा, यासाठी मनवर यांच्या कविता संग्रहातील 'पाणी कसं अस्त' ही कविता वगळण्याचा निर्णय मराठी अभ्यास मंडळाने एकमताने घेतला आहे. तसेच यापुढे अभ्यास मंडळ अभ्यासक्रमाचे नियोजन करीत असताना कोणत्याही समाज घटकाची भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेईल.
औरंगाबाद येथील पत्रकार सुरेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे स्वतः उपस्थित राहून दिलेल्या आपल्या खुलाशात समाज माध्यमावर अनवधानाने महिलांचा अपमान झाला असून महिला आयोग व महिलांची माफी मागतो असे म्हटले आहे. त्यांनी मूळ कवितेमध्ये बदल करून स्त्रियांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी समाज माध्यमांवर केली होती. त्यावर आयोगाने नोटीस बजावली होती.