प्रकाश होळकर, कवी -कविता लिहीत नव्हतो, चाचपडत होतो. त्यावेळी महानोरदादांना पहिल्यांदा मी नांदेडला शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पाहिले आणि ऐकले. कविसंमेलनात एखादं चैतन्याचं लदबदलेलं झाडच आपण बघतो आहे की काय, अशी अनुभूती मी घेतली. त्यांचे ते पायजमा-शर्टमधील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि शेती-मातीतील कविता ऐकल्याने भारावून गेलो. आपणही शेती करतो आणि आपलेच सुख-दु:ख त्यात मांडले आहे, हे जाणवले. त्यावेळी महानोरदादांशी ओळख नव्हती. परंतु, नंतर मी त्यांना पळसखेडला भेटायला गेलो. आज त्या गोष्टीला चाळीस वर्षे होऊन गेली.
त्यावेळी माझ्या नावावर कवितासंग्रह नव्हता. एखादी कविता ‘अनुष्टुभ’ला प्रसिद्ध झालेली असेल. परंतु, दिवसभर दादा आमच्यासोबत होते. त्यांनी शेतात फिरवले. सीताफळाच्या बागा दाखवल्या. कविता ऐकवल्या. पुस्तके दिली. हा अनुभव माझ्याच बाबतीत नाही, तर नवा कवी कुणीही त्यांच्याकडे गेला की, ते मार्गदर्शन करीत असत. त्याला कवितांचे संदर्भ, उदाहरणे देत असत. हजारो कविता त्यांना मुखोद्गत होत्या.
दादा प्रत्येकावर भरभरून प्रेम करायचे. माझ्या प्रत्येक सुख-दु:खात ते सोबत असायचे. छोटी-छोटी संमेलने व्हावीत, हा त्यांचा आग्रह असायचा. छोट्या संमेलनांमध्ये खऱ्या अर्थाने विचारांचे आदान-प्रदान होते, असे ते म्हणायचे. खेडेगावातून अस्सल कविता उदयाला येते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.