माथेरान : माथेरानवर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केल्याने येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. नैसर्गिक सौंदर्य न्याहाळण्यासाठी अडीच ते तीन हजार फूट उंचीचे डोंगर दऱ्यांनी व्यापलेल्या पॉइंटला पर्यटक आवर्जून भेटी देतात. मात्र बहुतांश पॉइंटवर संरक्षित कठडे नसल्याने पर्यटक पॉइंटच्या अगदी जवळ जाऊन डोंगर दऱ्यांचा तळ पाहण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन अनेकदा मृत्यूला आमंत्रण देण्याच्या घटना घडल्या आहेत. यासाठी महत्वाच्या पॉइंटवर संरक्षित कठडे उभारून पर्यटकांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी नागरिकांसह शिवसेनेच्या प्रसाद सावंत यांनी केली आहे.माथेरानमधील घोडा हेच पर्यटकांचे प्रमुख हौशी वाहन असल्याने पॉइंट पाहण्यास जाणारे नवखे पर्यटक घोडा स्वत: पुढे घेऊन जात असतात. काही वर्षांपूर्वी एक विदेशी महिला घोडेस्वारी करताना घोड्यावरील नियंत्रण सुटल्यावर पॉइंटला संरक्षित भिंत नसल्याने महिला घोड्यासह खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर अनेकदा प्रेमीयुगुले फोटो काढण्याच्या नादात अगदी टोकावर जातात आणि तोल जाऊन मरण ओढवून घेतात. आजूबाजूला डोंगरात राहणाऱ्या आदिवासींना नाईलाजास्तव दुर्गंधीमुळे पोलिसांच्या सांगण्यावरून प्रेते वर काढावी लागतात. यामुळे संबंधित खात्याने येथे संरक्षित कठडे उभारावेत.
माथेरानमध्ये पॉइंटला संरक्षक कठडे उभारावे
By admin | Published: April 26, 2016 3:25 AM