अमळगाव (जि. जळगाव) : अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रमशाळेतील ३० विद्यार्थ्यांना रविवारी मध्यरात्री विषबाधा झाली. सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निंभोरा येथील निवासी खासगी आश्रमशाळेत १२० विद्यार्थी शिकतात. रविवारी सायंकाळी ६ वाजता त्यांना खिचडी देण्यात आली. ३० विद्यार्थ्यांना रात्री २नंतर जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच विद्यार्थ्यांना अमळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यातील २० जणांची प्रकृती अधिक खालावल्याने, त्यांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. आरोग्य विभागाने उपलब्ध खाद्यपदार्थांच्या साठ्यामधून नमुने घेतले आहेत. रात्री शिजविलेल्या खिचडीचा व पाण्याचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. समाजकल्याण विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने अजून शाळेला भेट दिलेली नाही. (प्रतिनिधी)
जळगाव आश्रमशाळेतील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: February 09, 2016 12:58 AM