लातूर : वैद्यकीय बिल, महाराष्ट्र दर्शनचे बिल देण्यात आले नाही. तसेच भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करीत लातूर पंचायत समितीच्या एका कर्मचा-याने गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या कक्षात विषारी द्रव प्राशन केल्याची घटना घडली. दरम्यान, तेथील कर्मचा-यांनी तात्काळ त्यांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिलिंद ज्ञानदेव हौसलमल (५८) असे विषारी द्रव प्राशन केलेल्या कर्मचा-याचे नाव आहे. हौसलमल हे जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक होते. दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी त्यांची लातूर पंचायत समितीत बदली झाली होती. ही बदली नियमाप्रमाणे नाही, असा आरोप करीत त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. दरम्यान, ते बुधवारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले होते.
हौसलमल यांनी सन २०१९ मध्ये चार वैद्यकीय बिले जिल्हा परिषदेकडे सादर केली होती. त्यापैकी दोन बिले मिळाली होती तर उर्वरित दोन बिले मिळाली नव्हती. त्यासंदर्भात तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित विभागाच्या कर्मचा-यास नोटीस बजावली होती. याशिवाय, महाराष्ट्र दर्शनचे बिल मिळाले नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नाही, असा आरोप त्यांचा होता.
गुरुवारी सकाळी हौसलमल हे जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या दालनात येऊन काहीतरी लिहित होते. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे व कर्मचारी कामात व्यस्त होते. तेव्हा हौसलमल यांनी लिहित असलेले कागद फेकून देत मी आता राहत नाही, असे म्हणत विषारी द्रव प्राशन करीत बाटली फेकून दिली. त्यामुळे कक्षात गोंधळ उडाला आणि डॉ. वडगावे यांनी तात्काळ त्यांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल केले.
सेवानिवृत्तीदिवशीच घेतले विषारी द्रव...हौसलमल हे गुरुवारी सेवानिवृत्त होणार होते. त्याच दिवशी त्यांनी विषारी द्रव प्राशन केले आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.
काही विषय असल्यास ते नियमाप्रमाणे सोडवू...मी पालकमंत्र्यांसोबत नुकसानीच्या पाहणीच्या दौ-यात असताना ही घटना समजली. त्यांचे काही विषय असतील तर ते नियमाप्रमाणे सोडविण्यात येतील. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे सीईओ अभिनव गोयल यांनी सांगितले.