रॅडिको कंपनी बंद : ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर कारवाई विनोद काकडे/संजय देशपांडे ल्ल औरंगाबादसुखना धरणात विषारी रसायन सोडणाऱ्या रॅडिको मद्यनिर्मिती कंपनीला अखेर गुरुवारी शासनाने उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे रसायनामुळे गावकऱ्यांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ व शेतजमीन नापीक होत असल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. कुंभेफळसह आसपासच्या गावकऱ्यांनी फटाके फोडून निर्णयाचे स्वागत केले. औरंगाबादमधील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको मद्यनिर्मिती कंपनीतून दररोज तब्बल अडीच लाख लीटर घातक रसायन बाहेर पडत होते. त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे घातक रसायन थेट भूमिगत पाइपलाइनद्वारे पाझर तलावात सोडले जात होते. सांडव्याद्वारे ते कुंभेफळ नाला आणि तेथून पंधरा किलोमीटरवर सुखना धरणात मिसळत होते. धरणातून २५ गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच हजारो हेक्टर जमीनही नापीक होत चालली होती. धरणाचे पाणी पिल्याने जनावरेही दगावली होती.‘लोकमत’च्या बातमीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सलग तीन दिवस कंपनीतून निघणाऱ्या रसायनाचे, सुखनाच्या पाण्याचे आणि आसपासच्या मातीचे नमुने गोळा केले. त्याची तपासणी केली. त्यात रॅडिकोचा विषप्रयोग अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अहवाल व पुरावे मंगळवारी राज्याच्या पर्यावरण खात्याकडे सुपुर्द करण्यात आले होते. त्यानंतर शासनाचे आदेश मिळताच औरंगाबाद प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन थांबविण्याची नोटीस दिली. प्रत्यक्षात कंपनीतील उत्पादन पूर्णपणे बंद होण्यास रविवार उजाडू शकतो, असे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विषप्रयोग अखेर थांबला!
By admin | Published: June 26, 2015 3:16 AM