संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव:
तिरोडा तालुक्याच्या चोरखमारा तलावात दोन बार हेडेड गुज पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी उजेडात आले आहे. या स्थलांतरित मृत पक्ष्यांच्या तोंडात फेस दिसून येत असल्याने पक्ष्यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरक्षित अधिवास म्हणून हजारों मैल प्रवास करत विविध प्रजातीचे पक्षी येथे येतात. मात्र अशा घटनांमुळे पक्ष्यात असुरक्षितता निर्माण होण्याची शक्यता आहे.
थंडीची चाहूल होताच साधारणतः ऑक्टोबर महिन्यात पूर्व विदर्भातील तलाव,पणवठयांवर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. बार हेडेड गुज ( राजहंस) हा युरोपियन पक्षी आहे. सुमारे साडे चार हजार किमी प्रवास करत ते जिल्ह्यातील विविध तलावांवर दाखल होतात. जगात सर्वात उंचीवरून उडणारा पक्षी अशी बार हेडेड गुज पक्ष्याची ओळख आहे. हिमालयाच्या ३० हजार फूट उंचीवरून या पक्ष्यांचे थवे येथे दाखल होत असतात. पाणवनस्पतीची विविधता,तलावात असलेले मुबलक मासे व इतर जैवविविधतेच्या आकर्षणापोटी ते तब्बल सहा महिन्यांच्या अधिवासासाठी येथे येतात. चोरखमारा तलावात हे पक्षी ४० ते ५० च्या संख्येत असल्याचे समजते. उन्हाची चाहूल होताच हे पक्षी मार्च अखेरीस मायदेशी परततात.
पक्ष्यांची शिकार करण्यासाठी विषप्रयोग करण्यात आला की अन्य कारणांमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.मात्र घटनेच्या आठ दिवसांपूर्वी पक्ष्यांची अंडी चोरण्याचा प्रयत्न केला गेल्याच्या परिसरात चर्चा आहेत.विशेष उल्लेखनीय म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वीच नजीकच्या बोदलकसा येथे महाराष्ट्र शासनाचा पक्षी महोत्सव पार पडला होता.