ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ : पाश्चिमात्य देशातील आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘पोकेमॉन गो’ या गेमची दखल विधान परिषदेलाही घ्यावी लागली. व्हर्च्युअल आणि रिअल लाईफचा मिलाफ असणा-या गेमने अनेकांना वेड लावले असले तरी त्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या खेळाच्या नादात अनेकांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी, तरुणांसह या गेमची आवड असणा-यांना गेमबाबत दक्षतेच्या सूचना द्याव्यात अशी मागणी शिवसेना सदस्या नीलम गो-हे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधान परिषदेत केली.
मोबाईल वरच्या अनेक गेम्सना पोकेमॅन गो ने मागे टाकले आहे. या खेळामध्ये स्वत:चे लोकेशन द्यावे लागते. त्यानंतर जीपीएस च्या माध्यमातून पोकेमॉनचा पाठलाग करावा लागतो. त्यामुळे अनेकदा खेळ खेळणा-याचा जीव धोक्यात येतो, असा मुद्दा नीलम गो-हे यांनी उपस्थित केला. जगभरात २२ देशांत या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. इंडोनेशियात एक व्यक्ति हा खेळ खेळताना जावा प्रांतातील लष्कराच्या तळावर जाऊन पोहोचला होता. तर जीपीएस यंत्रणा आॅन असल्यामुळे महत्वाची माहिती बाहेर जाऊ शकते म्हणून कुवैतमध्ये बंदी घालण्यात आली आहे. द. अमेरिकेत २मुले निर्जन ठिकाणी पोहोचल्यामुळे गोळीबाराचे बळी ठरले. अरिझोना येथील एका शाळेने विद्यार्थ्यांना पोकेमॉन गो हा गेम खेळताना दक्षता घेण्याबाबत ईमेल द्वारे सूचना दिल्याचे गो-हे यांनी सांगितले.
त्यामुळे शासनाने या गेमचे धोके लक्षात घेऊन राज्यात सुरक्षिततेसाठी या खेळाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली.पोकेमॉनचा पाठलाग लहानग्यांच्या कार्टून विश्वातील हा पोकेमॉन गेमच्या माध्यमातून स्मार्ट फोनमध्ये दाखल झाला आहे. हा गेम खेळण्यासाठी सतत जीपीएस यंत्रणा सुरू ठेवावी लागते. खेळातील पोकेमॅनला शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. सतत फिरावे लागते. जिथे पोकेमॅन दिसतो तिथे जाऊन त्याला कॅप्चर करावे लागते. त्यामुळे गेम खेळताखेळता अनेकजण रात्रीअपरात्रीसुद्धा घराबाहेर पडतात. पोकेमॅनच्या नादात वाट्टेल तिकडे जातात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते, असेही यावेळी गो-हे यांनी सांगितले.