पोलादपूर : तालुका कृषी कार्यालय कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. पाणलोट समिती भ्रष्टाचार प्रकरणामुळे तालुका कृषी कार्यालय नागरिकांच्या चांगलेच लक्षात राहिले आहे. कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी असताना कृषी विभागात चांगली कामे होत होती, मात्र बदली झाल्याने पोलादपूर तालुका कृषी कार्यालय ठप्प झाले असल्याने कामकाजाची गती मंदावली असल्याचे नागरिकांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसायविषयक विविध योजना व पिकांवर पडणारे रोग याबाबतच्या माहितीकरिता तालुका कृषी विभागाचे कार्यालय असते, मात्र पोलादपूर तालुका कृषी कार्यालयाला कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी नसल्याने कार्यालय अधिकाऱ्यां विना सुरू असते. पोलादपूर तालुक्यातील शेतकरी सध्या तालुका कृषी अधिकारी भेटत नसल्याने त्रस्त झाले आहेत.पोलादपूर तालुक्यात शेतीशिवाय दुसरे उपजीविकेचे साधन नाही. तालुक्यातील ही शेतीदेखील केवळ पावसातील पाण्यावर अवलंबून आहे. उन्हाळ्यात केवळ नदीकिनाऱ्यावरील शेतात पिके घेण्यात येतात. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या विविध योजना देण्यात येत असतात. या योजनांची माहिती घेण्याकरिता शेतकरी तालुका कृषी कार्यालयात येतात. मात्र येथील कर्मचाऱ्यांकडून आवश्यक माहिती मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार असून, तालुका कृषी अधिकारी देखील वेळेवर भेटत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तालुका कृषी अधिकारी गोविंद कुलाल हे १५ सप्टेंबर २०१५ रोजी बदली होऊन गेले व पोलादपूर तालुका कृषी अधिकारी यांचे पद रिक्त झाले. तालुका कृषी अधिकारी हे कृषी विभागातील महत्त्वाचे पद असल्याने पद रिक्त राहू नये म्हणून तात्पुरता पदभार महाड तालुक्यातील मंडळ अधिकारी इंगळे यांच्याकडे दिला आहे.
पोलादपूर कृषी विकासाला खीळ
By admin | Published: April 27, 2016 3:25 AM