ऑनलाइन लोकमत
यासंदर्भात मंडळाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्याने शनिवारी मुंबईसह राजाच्या दराबारातही प्रचंड गर्दी झाली होती. यासंदर्भात एक महिला पत्रकार मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची प्रतिक्रिया घेण्यास स्टेजवर येत होती. मात्र यावेळी भायखळा पोलीस ठाण्याचे पीएसआय सत्यवान पवार यांनी पत्रकाराला रोखले. शिवाय एका पोलीस शिपाईच्यानातेवाईकांनी उलट दिशेने दर्शनासाठी सोडले. दरम्यान, मंडळाचा कार्यकर्ता रोहित श्रीवास्तव याने पत्रकाराला सोडण्यास सांगितले. यावरूनच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादात पवार यांनी रोहितला बेदम मारहाण केली.
उपचारासाठी रोहितला केईएम रूग्णालयात घेऊन गेले असता, त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचे कळाले. पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मंडळाने केली होती. मात्र गुन्हा दाखल न करता पोलिसांनी केवळ अर्ज स्वीकार केला. त्यामुळे याप्रकरणी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांकडे तक्रार करणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.
यावर काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगले म्हणाले की, मंडळाने केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सध्या बहुतांश फौजफाटा गणेशोत्सवाच्या बंदोबस्तमध्ये व्यस्त आहे. तरी लालबागचा राजा मंडपातील सीसीटीव्हीच्या मदतीने कार्यकर्ता आणि पोलीस अधिकारी यांमध्ये झालेल्या वादाची पाहणी केली जाईल. त्यात जो कोणी दोषी आढळेल, त्यावर निश्चित कारवाई केली जाईल.
शुक्रवारपासून रविवारपर्यंत बहुतांश गणपतींसह गौरींचे विसर्जन झालेले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस लालबाग राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत अधिक भर पडणार आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबतच पोलिसांनाही गर्दीला आवरण्यासाठी अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
पत्रकार उदय जाधव यांना लालबागचा राजा मंडळ परिसरात एसीपी अजय पाटणकर यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. माध्यमांसाठी असलेल्या विशेष कक्षाकडे जाताना पाटणकर यांनी अडवले. ओळखपत्र दाखवल्यानंतरही पाटणकर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप उदय जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांकडे तक्रार केल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही चित्रण तपासून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.