सैनिकांप्रमाणेच पोलिसांचा राज्याला अभिमान; तुमच्या चांगल्या घरांसाठी प्रयत्नशील राहणार: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 07:46 PM2020-06-12T19:46:06+5:302020-06-12T20:29:15+5:30
पोलीस शिपायांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मनापासून काम करुन कोरोना नियंत्रणासाठी दिले योगदान...
पुणे : माणुसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उत्तम कामामुळे पुणेपोलिसांप्रती नागरिकांचा आदर वाढला आहे. सैनिकांप्रमाणेच पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, असे गौरवोद्गार काढत पोलिसांना चांगली घरे मिळवून देण्यासाठी यापुढे निश्चितच प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिका-यांशी संवाद साधला. पुणे शहर पोलीस कर्मचारी बॅच 2012 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट देऊन पोलिसांची विचारपूस केली.
लॉकडाऊन कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांच्या माहिती फलकाची पाहणी करुन केली. तसेच कोरोनाचा धैयार्ने सामना करत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पवार यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. या कालावधीत काम करताना फिजिकल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर याचा वापर करा, असे सांगितले. याप्रसंगी लॉकडाऊन कालावधीत चांगली कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कामगिरीचे बनविण्यात आलेले 'फील द बिट' पुस्तिकेचे पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त डॉ.रवींंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग उपस्थित होते.
पवार म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी मागील ३ महिन्यांपासून राज्यातील पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत निरंतर काम करुन पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढेही शासनाच्या विविध आदेशांची अंमलबजावणी करुन कोरोनाला राज्यासह देशातून हद्दपार करुया, असे सांगून नागरिकांनी पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, लॉकडाऊन कालावधीत सोशल पोलीसिंग, आऊटरिच, स्क्रिनिंग, कंटेन्मेंट झोन परिसरात कडक निर्बंध राबवण्याबरोबरच जनजागृती करण्यासाठी पोलीस शिपायांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मनापासून काम करुन कोरोना नियंत्रणासाठी योगदान दिले आहे. डॉ. शिसवे यांनी लॉकडाऊन कालावधीत पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरणातून माहिती दिली.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सोशल मीडिया चित्रफितीबाबत व जनजागृती पुस्तिकांबद्दल, तर पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी पोलीस कल्याणकारी योजनांबाबत, तसेच पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी क्वारंटाईन व ड्रोन द्वारे नियंत्रण बाबत तसेच अन्य परिमंडळ 1 ते 5 पोलीस उपयुक्तांनी त्यांच्या परिमंडळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.