खामगाव : पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला मलकापूर पोलिसांनी नागपुरात अटक केली. शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणारा हिवसे पोलिसांत तक्रार दाखत होताच फरार झाला होता. अखेर आज रात्री साडे आठ वाजता पोलिसांनी नागपुरातून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला उद्या मलकापूर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तालुक्यातील उमाळी गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पीक कजार्साठी गुरूवारी (21 जून) सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत गेला होता. कागदपत्रांची तपासणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना शेतकऱ्याला बँक व्यवस्थापकाने केली होती. त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी शेतकऱ्याने मलकापूर पोलिसात तक्रार नोंदविली होती. महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात अपराध नं. १०८ /१८ कलम ३५४ अ, (२), भादंवि, सहकलम ३ (१), (डब्ल्यू) (१),३ (१),(डब्ल्यू) (२) अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. घटनेनंतर आरोपी बँक व्यवस्थापक राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण फरार झाला होता. पोलिसांनी शिपायास दोन दिवसापूर्वीच अटक केली आहे. यानंतर आज रात्री पोलिसांनी हिवसेला नागपुरात अटक केली.
शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 9:07 PM