नवी मुंबई : बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाला मारहाण झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी बारा जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. गावठाण भागांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे बेकायदेशीर वास्तव्य वाढले असून त्यांना स्थानिकांचेही पाठबळ मिळत आहे. कोंबडभुजे गावातील घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी मुंबई विशेष शाखेचे पोलीस पथक मंगळवारी पहाटे गेले होते. या वेळी जमावाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या ताब्यातील महिला बांगलादेशींनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. त्या ठिकाणी बेकायदेशीर वास्तव्याला असलेल्या बांगलादेशींना पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये चार पोलीस, तर पाच बांगलादेशी जखमी झाले असून, त्यापैकी तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात सुमारे १५० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी १२ जणांना पोलिसांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांना मारहाण; १२ अटकेत
By admin | Published: March 09, 2017 1:12 AM