जितेंद्र कालेकर / ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 16 - शहर पोलीस मुख्यालयात गार्ड डयुटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर गणपत मालुसकर (२२) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मालुसकर हे २०१४ मध्ये ठाणे शहर आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस सेवेत भरती झाले. २०१५ ते २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पोलीस मुख्यालयात नियुक्ती मिळाली होती. तिथे गुरुवारी गार्ड डयूटीवर असतांना त्यांनी आपल्या सेल्फ लोडींग रायफल अर्थात एसएलआरमधून स्वत:वर एक गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या डाव्या खांद्याच्या खालील भागाला लागली. हा प्रकार काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांना तातडीने जवळच्याच विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने असल्यामुळे त्यांना तातडीने येथील ज्युपिटर या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
त्यांनी स्वत:वर नेमकी कोणत्या कारणामुळे गोळी झाडली, याबाबतची नेमकी माहिती उपलब्ध नसल्याचे मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक (आरपीआय) नामदेव शिंदे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. ते अविवाहित असून विटावा भागात वास्तव्याला आहेत. दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच ठाणे शहर पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, नौपाडा विभागाचे सहायक आयुक्त अविनाश मोहिते, ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते जबाब देऊ न शकल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले.
एकीकडे गणेश विसर्जनाच्या मिरवणूका सुरु असताना मुख्यालयात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ आहे. त्यांच्यावर या रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली. गोळी खांद्याजवळून आरपार गेल्यामुळं बराच रक्तस्त्रावही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीसांवरील हल्ल्याचे सत्र सुरु असतांना मालुसकर यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबतचाही सखोल तपास येत असल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली.