पुणे : पहाटे साडेतीनची वेळ... रस्त्यावर शुकशुकाट.. अवघडलेली स्त्री रस्त्यावरच व्याकूळ झालेली...कुठे, कुणाची मदत मिळतेय, यासाठी सोबत असलेल्या वयस्क महिलेचा जीव टांगणीला लागलेला... इतक्यातच एक पोलीस व्हॅन ‘जीवनदूत’च्या रूपाने त्यांच्याजवळ येऊन थांबते. अवघडलेल्या स्त्रीच्या वेदना पाहून त्यांना व्हॅनमध्ये घेतले जाते...तिचा रुग्णालयाच्या दिशेने प्रवास असतानाच तिची व्हॅनमध्ये प्रसूती होते... दोघांनाही तातडीने रुग्णालयात सुखरूपपणे पोहोचवले जाते अन् पोलिसांमधील माणुसकीमुळे आई-बाळाचे प्राण वाचतात! ही कोणती गोष्ट नाही, तर पुण्यात शनिवारी पहाटे घडलेली घटना आहे.अलका वैभव बालगुडे (वय २८, रा. मार्गासनी, ता. वेल्हा) यांच्या आयुष्यात शनिवारची पहाट नवी पालवी घेऊन आली. पोलीस व्हॅनमध्येच प्रसूती झालेल्या अलका यांना पुत्ररत्न झाले असून, दोघांचीही स्थिती उत्तम आहे. त्यांच्यावर मंगळवार पेठेतील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खडक पोलीस, वायरलेस आणि रुग्णालयातील यंत्रणेने बजावलेल्या या कर्तव्यामुळे माय-लेक दोघेही सुखरूप आहेत. अलका बालगुडे घोरपडे पेठेतील महापालिकेच्या उद्यानालगत राहणाऱ्या आपल्या आई माणिकबाई पवार यांच्याकडे बाळांतपणासाठी आल्या आहेत. अलका यांच्यावर मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात ट्रिटमेंट सुरू होती. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांना वेदना सुरू होतात. त्या वेळी त्यांच्या आईने याबाबत बिबवेवाडी येथे राहणारी मोठी मुलगी शोभा डांगे यांना फोन करून सांगितले. शोभा व त्यांचे पती मिलिंद हे चारचाकी वाहनाने तिकडे निघू लागले; पण वेदना असह्य होऊ लागल्याने दोघींनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या कडेलाच घर असल्याने अलका या रस्त्यावर येऊन थांबल्या, तर माणिकबाई यांनी वाहनाची शोधाशोध सुरू केली. अलका यांच्या वेदना वाढतच चालल्या होत्या. इतक्यात गस्त घालत असलेली खडक पोलीस ठाण्याची व्हॅन त्याठिकाणी आली.सहायक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर, पोलीस कर्मचारी दत्तात्रय रत्नपारखी, नितीन टेटकर, पोलीस मित्र शिरीष शिंदे व नसरुल्ला बागवान या व्हॅनमध्ये होते. अलका यांना प्रसूती वेदना होत असल्याचे पाहून त्यांना तत्काळ व्हॅनमध्ये घेतले. व्हॅन थोडी पुढे गेलेली असताना त्यांची प्रसूती झाली. या वेळी इप्पर यांनी रुग्णालयाशी संपर्क साधून डॉक्टरांच्या टीमला तयार राहण्यास सांगितले. व्हॅन रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचताच रुग्णालयाच्या टीमने दोघा माय-लेकांवर उपचार सुरू केले.(प्रतिनिधी)...हा तर आमचा पुनर्जन्म‘पोलीस व्हॅन आली, तेव्हा खूप वेदना होत होत्या. बाळाचे डोके थोडेसे बाहेर आले होते. नेमकी त्याच वेळी व्हॅन आल्याने आमच्या दोघांचाही पुनर्जन्म झाला. पोलीस देवासारखे धावून आले. त्यांनी सहकार्य केले नसते तर काय झाले असते, याचा विचारही करवत नाही,’ अशी भावना अलका बालगुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘रुग्णालयात जाईपर्यंत बाळ पूर्ण बाहेर आले होते. रुग्णालयाबाहेर लगेच डॉक्टर व नर्स आल्या. त्यांनी सुरुवातीला बाळाची नाळ कापून त्याला रुग्णालयात नेत उपचार सुरू केले. नंतर मला आतमध्ये नेले. आता आमच्या दोघांची तब्येत व्यवस्थित आहे. मी पोलिसांचे आभार मानते.’महिलेची स्थिती पाहून, आम्ही त्यांना रुग्णालयात पोहोचविण्याचा निर्णय घेतला. महिला व्हॅनमध्येच प्रसूत झाल्यानंतर आम्ही वायरलेसला कळवून रुग्णालयातील टीम तयार ठेवायला सांगितली होती. त्यानुसार सर्वकाही व्यवस्थित पार पडले. आम्हा सर्वच सहकाऱ्यांसाठी ही सुखद घटना होती, असे सहायक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर यांनी सांगितले. दरम्यान, इप्पर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहायक पोलीस आयुक्त प्रवीण कुलकर्णी, पोलीस उपायुक्त तुषार दोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघूनाथ जाधव व पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी अभिनंदन केले.
आई-बाळासाठी पोलीस बनले जीवनदूत!
By admin | Published: December 20, 2015 2:20 AM