लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : गेल्या तीन दिवसांपासून घोट चाळ येथील स्थानिकांनी क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यास विरोध केल्याने सिडको वसाहतीत कचऱ्याची भीषण समस्या निर्माण झाली होती. अखेर पोलीस बंदोबस्तात गुरुवारी क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यास सुरुवात झाल्याने वसाहतीतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ऐन पावसाच्या तोंडावर शहरात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पावसाच्या हजेरीने कचरा कुजण्यास सुरुवात झाल्याने दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे सिडको प्रशासनासमोर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. खारघर, कळंबोली शहरात गेल्या तीन दिवसांपासून कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले होते. यासंदर्भात खारघर, कळंबोली या दोन्ही नोडचे प्रशासक सीताराम रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता, घोट चाळ येथील क्षेपणभूमीवर कचरा टाकण्याच्या वादावर तूर्तास पडदा पडला असून लवकरच वसाहतीतील कचरा उचलला जाईल, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, धनाजी पाटील, नगरसेवक हरेश केणी यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मांडलेल्या काही अटी मान्य करण्यात आल्या आहेत. कचरा उचलण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले असून गुरु वारी सायंकाळपर्यंत ५० गाड्या कचरा उचलण्यात येईल, आणि पुन्हा अशी समस्या उद्भवणार नाही याकरिता काळजी घेणार असल्याचेही रोकडे यांनी सांगितले.>औद्योगिक परिसरात चार घंटागाड्या सुरूतळोजा : तळोजा औद्योगिक परिसरातील कारखान्यांचा घनकचरा आता पनवेल महापालिका वेळच्या वेळी उचलणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. यासाठी चार घंटागाड्या तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या स्वाधीन करण्यात आलेल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी हा निर्णय घेतलाआहे. तळोजा औद्योगिक परिसरात हजारो कारखाने आहेत. बऱ्याचदा कारखानदारांकडून कचरा जाळला जात असल्याने परिसरात प्रदूषण वाढते, शिवाय अस्वच्छताही होते. मात्र आता हाच कचरा कारखान्यांच्या गेटवरून चार घंटागाडीद्वारे शुक्रवारपासून उचलला जाणार आहे.
पोलीस बंदोबस्तात क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यास सुरुवात
By admin | Published: June 09, 2017 2:37 AM