मुंबई : ‘महिलांसाठी मोफत, सुरक्षित, स्वच्छ आणि सार्वजनिक मुताऱ्या हव्यात’ या मागणीकडे गेली तीन वर्षे कानाडोळा करणाऱ्या पालिका अधिका-यांना त्यांचे काम काय आहे, हक्क काय आहेत आणि हक्कांचा वापर करा अखेर असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आतापर्यंत स्वच्छतागृह चालवणाऱ्यांची मुजोरी मोडीत निघेल आणि पालिका अधिकारी सक्रिय होतील, अशी आशा वाटत असल्याचे राईट टू पी सदस्यांची म्हणणे आहे. १० सप्टेंबरपासून वॉर्डनिहाय स्वच्छतागृहांची माहिती महापालिकेने घेतली. तीन दिवसांमध्ये हाती आलेली माहिती तितकीशी सकारात्मक नाही. कारण बहुतांश स्वच्छतागृहांपर्यंत परिपत्रक पोहचलेले नाही, काही ठिकाणी परिपत्रक पोहचले असून अंमलबजावणी झालेली नाही. अजूनही मुंबईत अनेक ठिकाणी महिलांकडून मुतारी साठी पैसे घेणे सर्रास सुरू आहे. पैसे घेणाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे विभागानुसार पैसे आकारले जात आहेत. दक्षिण मुंबईमध्ये दोन रुपये, दादर भागात काही ठिकाणी ५ रुपये तर पश्चिम उपनगरांमध्ये ३ रुपये आकारले जात आहेत. याविषयी तक्रारी महापालिकेकडे आल्या नसल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे महापालिकेचे आतापर्यंत म्हणणे होते. स्वच्छतागृह चालवणारे मुजोरी करत असल्याचे सत्य आता महापालिकेसमोर आले आहे. त्याचबरोबरीने अजूनही महिलांकडून पैसे आकारले जात असल्याचे महापालिकेसमोर उघड झाले असल्यामुळे आता अशा स्वच्छतागृहांवर कारवाई करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांवर त्या त्या विभागातील स्वच्छतागृहांची जबाबदारी सोपण्यात आली आहे. हेच अधिकारी स्वच्छतागृहांची पाहणी करणार आहेत. या सर्वांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जर एखादे स्वच्छतागृहामध्ये अंमलबजावणी होत नसल्यास त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. आणि तरीही नाही ऐकल्यास त्यांचा करार रद्द करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) प्रकाश पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालिकेला अखेर आली जाग!
By admin | Published: September 13, 2014 3:06 AM