यदु जोशी, मुंबईराज्यातील पोलीस शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंत बदल्यांचे अधिकार निश्चित करण्याबाबतचा अध्यादेश राज्यपालांनी जारी केला आहे. त्यानुसार पोलीस शिपायाची बदली आता पाच वर्षांपर्यंत होणार नाही. आतापर्यंत दोन वर्षांनंतर ही बदली व्हायची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खाते असून, बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने त्यांच्या विभागाने अध्यादेशाचा मसुदा राज्यपालांकडे पाठविला होता. त्याला राज्यपालांनी आज मंजुरी दिली. आतापर्यंत पोलीस शिपायांच्या बदल्यांचे अधिकार ग्रामीण भागात पोलीस महानिरीक्षकांकडे होते. आता ते जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. आयुक्तालयामध्ये ते पोलीस आयुक्तांना असतील. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाला असतील. त्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस उपाधीक्षकाचा समावेश असेल. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्याचे अधिकार पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाला असेल. आयुक्तालय हद्दीत हे अधिकार शहर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील मंडळाला असेल.
पाच वर्षानंतरच पोलिसांची बदली
By admin | Published: February 14, 2015 6:08 AM