डिप्पी वांकाणी , मुंबईखुराड्यासारख्या तुटपुंज्या आणि कमालीच्या निकृष्ट दर्जाच्या घरात राहणाऱ्या पोलिसांचे चांगल्या प्रशस्त घरांचे स्वप्न मार्गी लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. सरकारी चौकट मोडीत काढून खासगी वास्तुरचनाकारांच्या सेवा घेऊन पोलिसांसाठी दोन बेडरूम, हॉल-किचन (टू बीएचके) अशी प्रशस्त व सुविधायुक्त घरे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. यातून पहिल्या टप्प्यात राज्यातील किमान दोन हजार पोलिसांना चांगले घर मिळणार आहे. पोलिसांच्या सध्याच्या घरांची कणव वाटावी अशी परिस्थिती इतिहासजमा करण्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. अतिशय हलक्या दर्जाच्या निवासस्थानांचा आराखडा केल्याबद्दल गेल्या वर्षी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाने (एमएसपीएचडब्लूसी) २०० वास्तुरचनाकारांना (आर्किटेक्ट) कामावरून काढून टाकले होते व पोलिसांसाठीच्या निवासस्थानांच्या आराखड्यासाठी खुल्या बाजारातून वास्तुरचनाकारांची सेवा घेण्याचा विचार केला. त्यातूनच एकट्या मुंबईत ५४० निवासस्थानांचे बांधकाम सुरू आहे व राज्यांत इतरत्र १८८२ घरांच्या बांधकामाचे नियोजन आहे. एमएसपीएचडब्लूसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांसाठीच्या या आधुनिक निवासस्थानांमुळे त्यांचे नीतिधैर्य वाढण्यासोबतच त्यांच्या मुलांच्या आकांक्षांना पोषक वातावरणही मिळणार आहे. या घरांमध्ये शौचकुपात पाश्चिमात्य पद्धतीचे कमोड व संपूर्ण घरात व्हिट्रिफाइड टाइल्स बसविल्या जात आहेत. संशोधन आणि डिझायनिंग विभागालाही आम्ही संपूर्ण अत्याधुनिक बनविले असून, त्यात आता अनिवासी भारतीय काम करीत आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. नियोजित प्रकल्पमाहीममधील मच्छीमार कॉलनीत पोलीस शिपायांसाठी ५५० निवासस्थाने, वाडीबंदरमध्ये (मुंबई) पोलीस शिपायांसाठी १४० निवासस्थाने, वाकोला (मुंबई) येथे ३२४ निवासस्थाने, दर्यापूर (अमरावती) येथे एसडीपीओ प्रशासकीय इमारत व ५४ निवासस्थाने, अंजनगाव (अमरावती) येथे एसडीपीओ प्रशासकीय इमारत व ५४ निवासस्थाने, माजलगाव (जि. बीड) येथे ३२ निवासस्थाने, खामगाव (जि. बुलडाणा) येथे पोलीस अधीक्षकांसाठी ६१ निवासस्थाने, बाभळगाव (जि. लातूर) येथे पोलीस प्रशिक्षण शाळा आणि ५६ निवासस्थाने, इंदोरा (नागपूर) येथे पोलीस अधीक्षकांसाठी(ग्रामीण) ४३८ निवासस्थाने, वडखळ (जि. रायगड) येथे ३४ पोलीस निवासस्थाने, तासगाव (जि. सांगली) येथे पीटीएस इमारत आणि ३९ निवासस्थाने, वाशिम येथे पोलीस अधीक्षकांसाठी १०० निवासस्थाने.प्रगतिपथावरील प्रकल्पवरळीत (मुंबई) पोलीस शिपायांसाठी ४०० निवासी बांधकामे. सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई येथील बिनतारी संदेश कार्यालयासाठी १४० पोलीस निवासस्थाने.प्रशस्त घरांची भेटपोलीस शिपायांसाठी ४५० चौरस फुटांचे दोन बेडरूमचे, तर पोलीस उपनिरीक्षकासाठी ५५० चौरस फुटांचे अडीच बेडरूमचे घर असेल. पोलीस उप अधीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी तीन बेडरूमचे ७७० चौरस फुटांचे घर असेल.
खुराड्यातले पोलीस जाणार घरांमध्ये!
By admin | Published: July 02, 2015 4:11 AM