मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. राज्यभरातही शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
- ठाणे : ठाण्याच्या ग्रामीण एस पी ऑफिसजवळ असणाऱ्या पोलीस शहिद स्मारक येथे ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पोलीस शहिद जवानांना सलामी देण्यात आली.
- रायगड : रायगड पाेलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शहिद स्मारकास रायगडचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलीस शहिद जवानांना सलामी देण्यात आली. यावेळी रायगड जिल्हाधिकारी डाॅ. विजय सुर्यवंशी, पाेलीसअधिक्षक अनिल पारसकर आदि मान्यवर उपस्थित हाेते.
- अमरावती : आज शहीद पोलीस मानवंदना दिवस, पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली. यावेळी अमरावती शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, तसेच राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली.
- नवी मुंबई : पोलीस स्मृतीदिनी नवी मुंबई पाेलीस मुख्यालयात आदरांजली वाहण्यात आली. बेलापूर पाेलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शहिद स्मारकास पोलीस शहिद जवानांना सलामी देण्यात आली.
- पालघर : पालघर येथील पोलीस अधिक्षक कार्यालय येथे शहीद झालेल्या पोलिसांना पोलीस स्मृती दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली.
- सोलापूर : २१ ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनानिमित्त देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस हुतात्म्यांना सोलापूर पोलीस दलाकडून आदरांजली वाहण्यात आली.
- जळगाव : जळगावमध्ये जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व मानवंदना देण्यात आली.