अमरावती : पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अपमानास्पद भाष्य केले. या वक्तव्यामुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे केंद्रीय मंत्री आठवलेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी तक्रार अॅड. संजय वानखडे यांनी रविवारी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांत केली. ३ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या गीताचा अपभ्रंश करून म्हटले की, 'माझी मैना गावाकड राहिली, म्हणून मी मुंबईकडे दुसरी पाहिली'. आठवले यांच्या या व्यक्तव्यामुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आठवलेंच्या या व्यक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांचे हे शब्द शांतता व सुव्यवस्था बिघडवू शकतात. त्यांनी शासकीय कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांचा अपमान केला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. सोबतच पिंपरी चिंचवड येथील महापालिका प्रशासनही जबाबदार आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९५(अ), ५०४, १२०(ब) व अॅट्रॉसिटी अॅक्टचे कलम ३(१), (यू), (व्ही) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाची तक्रार मानवहित लोकशाही पक्षाचे विदर्भ अध्यक्ष अॅड. संजय वानखडे यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत दिली आहे. याबद्दलची तक्रार मिळाली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाईची दिशा ठरेल, असे ठाणेदार पंजाब वंजारी यांनी सांगितले.
'त्या' विधानामुळे मुख्यमंत्री, आठवलेंविरोधात पोलीस तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 10:00 PM