मुंबई : पोलिसांना नागरिकांकडून मारहाण व धमकाविण्याच्या घटना सुरूच असून, पश्चिम उपनगरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण व शिवीगाळ होण्याचा प्रकार घडला आहे. डी.एन. नगर येथे दोन मोटारसायकलस्वारांनी कॉन्स्टेबल संजय नवले यांना मारहाण केली. तर गोरेगाव महामार्गावर हवालदार सुनील टोके यांना कारवाई टाळण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करीत धमकाविण्याची घटना घडली. डी.एन. नगर वाहतूक शाखेतील कॉन्स्टेबल नवले हे शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून घरी निघाले असताना डी.एन. नगर मेट्रो जंक्शनजवळ एक कार व मोटारसायकलची एकमेकांस धडक बसून अपघात झाला. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत असतानाच नवले तेथे पोहोचले व त्यांनी त्यांना रस्त्याच्या बाजूला घेतले. मोटारसायकलीवरील साळवे व बनसोडे दारूच्या नशेत होते. त्यांनी शिवीगाळ करीत नवलेंनाच मारहाण केली. नवलेंनी तातडीने सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत दोघांना पकडून डी.एन. नगर पोलीस ठाण्यात नेले. दुसरी घटना गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडली. दिंडोशी वाहतूक नियंत्रण शाखेतील हवालदार सुनील टोके हे कॉन्स्टेबल पाटील व अन्य दोघा सहकाऱ्यांसमवेत ड्युटी करीत होते. त्या वेळी गोरेगाव पूर्वच्या बिंबिसार गेटसमोर येत असलेल्या टेम्पोचालकाने मार्गिकेची शिस्त न पाळल्याने पाटील यांनी त्याला अडविले. हवालदार टोके यांनी चालक रायसाहेब यादव याच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने कागदपत्रे न दाखविता दोघांशी हुज्जत घातली आणि फोन करून संजय तिवारी नावाच्या व्यक्तीला बोलाविले. त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगून ‘पैसा लेके छोड दो’ असे सांगत ‘मेरी बडे अफसरों से पहचान है, तुम्हे देख लेंगे’ असे धमकाविले. त्यामुळे टोके यांनी नियंत्रण कक्षावर फोन करून मदत मागविली. त्यानुसार वनराई पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलनी तिवारी व यादव यांना पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
पोलिसांना मारहाणीचे प्रकार सुरूच
By admin | Published: March 06, 2016 3:31 AM