ऑनलाइन लोकमत -
पिंपरी, दि. 16 - गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा दिघी भारतनगर येथे गुरूवारी रात्री डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या ९ आरोपींना शनिवारी दुपारी खडकी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सात आरोपींना २१जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अतुल अमृत मोहिते (वय २५)याच्यासह सुशांत जालिंदर पवार (वय २०) अमोल ऊर्फ बल्ली कैलास पठारे (वय २४, रा. आळंदी रोड), शैलेश सूर्यकांत वाळके (वय २६, रा. यमाईनगर, दिघी), विशाल दत्ता पारखे (वय ३२, रा. विश्रांतवाडी, पुणे), निवृत्ती उर्फ बाळू किसन वाळके (वय ४५, रा. गांधी चौक, दिघी), प्रेम उर्फ कक्का उर्फ प्रमोद संताराम ढोलपुरीया (वय २३, रा. रामनगर, बोपखेल) यांना शनिवारी खडकी न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले तर शौकत मुनीर आत्तार (वय २४), तुषार कान्हु जाधव (वय २०, रा. सर्व रा. भारतमाता नगर, दिघी) या दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सोन्याच्या शर्टामुळे चर्चेत आलेल्या ‘गोल्डन मॅन’ दत्तात्रय फुगे (४७, रा. शीतल बाग, भोसरी) यांचा गुरुवारी मध्यरात्री दिघी येथील भारतमातानगरमध्ये निर्घृण खून झाला. त्यांच्या मुलासमोरच धारदार कोयत्याने वार केल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आला. आरोपींपैकी एकाकडे असलेल्या पैशांसाठी फुगे यांनी तगादा लावल्यामुळे हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वाढदिवसाचे खोटे निमंत्रण देऊन फुगेंना बोलावून घेण्यात आल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगे यांचा वक्रतुंड चिटफंड, शुभम फायनान्स या नावाने कर्ज देण्याचा व्यवसाय आहे. यामधून दिघी, भोसरी आदी भागात फुगे यांची ओळख आणि दहशतही वाढली होती. अटक आरोपी फुगे यांना गुंतवणूकदार शोधून देण्याचे काम करीत होते. यातील विशाल पाखरे याने फुगे यांच्याकडून दिड लाख रुपये घेतलेले होते. या पैशांसाठी फुगे यांनी तगादा लावलेला होता. तसेच एक महिन्यापूर्वी आरोपींसोबत त्यांची वादावादी झाली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातूनच खूनाचा कट रचण्यात आला.
त्यानुसार, मुख्य आरोपी अतुल मोहिते याने शुभमच्या मोबाईलवर फोन करुन त्याच्या वडिलांना मित्राच्या वाढदिवसासाठी पाठवण्यास सांगितले. त्यानुसार शुभमने फुगे यांना फोन केला. परंतु त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे त्याने आईला फोन करुन निरोप दिला. त्यांच्याकडून निरोप मिळाल्यावर फुगे यांनी शुभमला फोन करुन बिर्याणी आणि खाद्यपदार्थ घेऊन वाढदिवसाच्या ठिकाणी येण्यास सांगितले. फुगे त्यांच्या मोटारीमधून अतुल मोहितेच्या घराजवळ पोचले. मोहिते व अन्य आरोपींनी त्यांना गप्पा मारत जवळच असलेल्या ट्रॅव्हल बसच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत नेले. तेथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्यांनी सुरुवातीला वार करीत फुगे यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये दोन मोठे दगड घालून खून केला. हा प्रकार सुरू असतानाच फुगे यांचा मुलगा शुभम बिर्याणी घेऊन घटनास्थळी पोचला. स्वत:च्या डोळ्यासमोरच वडीलांचा होणारा खून पाहून तो जागीच थबकला. आरडाओरडा करीत त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली.