ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 07 - हप्त्याने लॅपटॉप खरेदी करुन देण्याच्या बहाण्याने एका पोलीस पुत्राने मित्राच्या मदतीने शेजारी राहणाऱ्या पोलीस जमादाराची फसवणूक केली. डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या या फसवणूक प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.संदीप साठे आणि सुनील भाले अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, मिलकॉर्नर येथील पोलीस कॉलनीत राहणारे पोलीस जमादार देवेंद्र ढाकणे यांच्या शेजारी आरोपी संदीप साठे राहतो. तो निवृत्त पोलिसाचा मुलगा आहे. शेजारी असल्याने संदीप आणि जमादार ढाकणे हे चांगले परिचित आहेत. संदीप १७ डिसेंबर २०१५ रोजी ढाकणे यांच्या घरी गेला. हप्त्याने लॅपटॉप खरेदी करुन देतो,असे त्याने सांगितले. ढाकणे यांनाही लॅपटॉप खरेदी करायचा असल्याने तेही तयार झाले. संदीपने त्याचा मित्र सुनील भालेसह दुसऱ्या दिवशी पुन्हा ढाकणे यांचे घर गाठले. ढाकणे यांच्याकडून त्याने बजाज फायनान्स कंपनीच्या ईएमआय कार्डची झेरॉक्स प्रत व कर्ज फॉर्मवर सह्याही घेतल्या. आरोपींनी ढाकणे यांच्या कागदपत्राच्या आधारे स्वत:साठी मोबाईल खरेदी केला. या मोबाईलच्या दोन हप्त्याची रक्कम ढाकणे यांच्या बँक खात्यातून वजा झाली. ही बाब समजल्यानंतर ढाकणे यांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने तुमच्या बँक खात्यातून कपात झालेल्या हप्त्याची रक्कम तुम्हाला देतो,असे सांगितले. शेजारीच राहणारा असल्याने त्यांनी आरोपीवर विश्वास ठेवला. मात्र ९ महिने उलटल्यानंतरही त्याने पैसे दिले नाही. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच ढाकणे यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस नाईक हवालदार विकास खटके हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असल्याचे खटके यांनी सांगितले.
पोलीसपुत्राकडून पोलिसाची फसवणूक
By admin | Published: October 07, 2016 8:14 PM