ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 4 - वाकडच्या ताथवडे येथील बालाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून आमदार कन्येवर सत्तुराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना काल (दि.3) वाकडमध्ये घडली होती. या घटनेतील आरोपीला कॉलेजमधील सुरक्षारक्षक आणि मुलांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राजेश परवेशकुमार बक्षी (वय 25. रा. वाकड, मूळ, हरियाणा), असे आरोपीचे नाव आहे. त्याने यवतमाळ वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मुलगी अश्विनी हिच्यावर सत्तूरने वार केला होता. राजेश आणि पीडित मुलगी एका कॉलेजमध्ये शिकतात. तु माझ्याशी का बोलत नाहीस या शुल्लक कारणावरून त्याने काल तिच्यावर हल्ला केला होता. यामध्ये मुलीच्या डाव्या हाताची करंळी निकामी झाली आहे तर तीन दात आणि ओठांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काल तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
बालाजी कॉलेजकडून खुलासा मागविणार-
वाकड येथील बालाजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने संबंधित विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार करूनही त्या विद्यार्थ्यावर कारवाई का केली गेली नाही, याचा खुलासा कॉलेजकडून मागविला जाणार आहे. त्यानंतर त्या कॉलेजविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
संबंधित विद्यार्थिनीने त्या विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार केली असल्याची माहिती उजेडात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्या कॉलेजकडे खुलासा मागविण्यात येणार आहे. विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा गाडे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. महाविद्यालयांच्या स्थानिक व्यवस्थापन समितीवर विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, याच्या सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये काऊन्सेलिंग सेल उभारणे आवश्यक असेल, तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी नोंदविता येतील, अशी माहिती वासुदेव गाडे यांनी दिली.